२ टीएमसी ऐवजी ४ टीएमसी पाणी देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - आ. संजय बनसोडे
लातूर, 25 नोव्हेंबर, (हिं.स.)। लातूर जिल्ह्यातील नागरिकांना भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी उजनी धरणाचे पाणी लातूर जिल्ह्यात आणण्याच्या दृष्टीने ठोस प्रयत्न करणार आहोत. कृष्णा खोऱ्यातून मराठवाड्याला सात टीएमसी पाणी देण्याचा निर
संजय बनसोडे


लातूर, 25 नोव्हेंबर, (हिं.स.)। लातूर जिल्ह्यातील नागरिकांना भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी उजनी धरणाचे पाणी लातूर जिल्ह्यात आणण्याच्या दृष्टीने ठोस प्रयत्न करणार आहोत. कृष्णा खोऱ्यातून मराठवाड्याला सात टीएमसी पाणी देण्याचा निर्णय झाला असून, या योजनेच्या माध्यमातून सध्या दोन टीएमसी पाणी उजनी धरणातून सीना-कोळेगाव धरणामार्गे तुळजापूर येथील रामदरा तलावात आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, लातूर जिल्ह्याची पाण्याची गरज लक्षात घेता दोन टीएमसीऐवजी चार टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून करणार असल्याची माहिती माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी दिली.

कृष्णा खोऱ्यातील पाणी मराठवाड्याला उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे. त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात दोन टीएमसी पाणी कृष्णा खोऱ्यातून उजनी धरणात आणण्याचे नियोजन आहे. त्यानंतर उजनी धरणातून सीना-कोळेगाव धरणामार्गे तुळजापूरच्या दिशेने असलेल्या रामदरा तलावात हे पाणी पोहोचविण्यात येणार आहे. या कामासाठी आवश्यक असलेल्या बोगद्याचे काम पूर्ण झाले असून, पंपिंगच्या माध्यमातून पाणी पुढे नेण्याची यंत्रणाही सज्ज झाली आहे. येत्या १५ दिवसांत रामदरा तलावात पाणी पोहोचण्याची अपेक्षा आहे.

या योजनेमुळे सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा दिलासा मिळणार आहे. रामदरा तलावात पाणी उपलब्ध झाल्यानंतर परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. विशेष म्हणजे, मराठवाड्यातील दुष्काळी भागासाठी कृष्णा खोऱ्यातील पाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

लातूर जिल्ह्यासाठी चार टीएमसी पाण्याचा आग्रह

लातूर जिल्ह्यात यंदा अत्यल्प पावसामुळे गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. भविष्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये, यासाठी कायमस्वरूपी जलस्रोत उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर सध्या नियोजित असलेल्या दोन टीएमसी पाण्याऐवजी चार टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी करणार आहोत.

यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन लातूर जिल्ह्याच्या पाणीप्रश्नाचे गांभीर्य त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहोत. लातूर जिल्ह्यातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी आवश्यक त्या स्तरावर पाठपुरावा केला जाईल.

उजनीचे पाणी लातूरला आणण्याचे स्वप्न पूर्ण करणार

उजनी धरणाचे पाणी लातूर जिल्ह्यात आणणे ही जिल्ह्यातील जनतेची अनेक वर्षांपासूनची अपेक्षा आहे. या पाण्यामुळे जिल्ह्यातील शहरांसह ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे केवळ तात्पुरत्या उपाययोजना न करता भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन कायमस्वरूपी नियोजन करण्यावर भर देणार आहोत.

लातूर जिल्ह्यातील जनतेला पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळावे, यासाठी उजनीच्या पाण्याचा पर्याय प्रत्यक्षात आणण्याकरिता शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करणार असून, उजनीचे पाणी लातूरला आणण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार असल्याचेही माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande