भारतीय महिला हॉकी संघाची एफआयएच जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर झेप
भोपाळ, 25 नोव्हेंबर (हिं.स.) भोपाळमधील नाथू बरखेडा येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात सुरू असलेल्या ''मध्य प्रदेश महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२६'' मध्ये, चीनवर ६-२ असा दणदणीत विजय मिळवत भारतीय महिला हॉकी संघाने आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्य
भारतीय महिला हॉकी संघ


भोपाळ, 25 नोव्हेंबर (हिं.स.) भोपाळमधील नाथू बरखेडा येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात सुरू असलेल्या 'मध्य प्रदेश महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२६' मध्ये, चीनवर ६-२ असा दणदणीत विजय मिळवत भारतीय महिला हॉकी संघाने आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर पोहोचून इतिहास घडवला आहे.

ही ऐतिहासिक कामगिरी भारतीय महिला हॉकीच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा असून, ती संघाच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावलेल्या प्रतिष्ठेचे प्रतीक आहे. ऑक्टोबर २००३ मध्ये सुरू झालेल्या एफआयएच जागतिक क्रमवारीत भारतीय महिला संघाने गेल्या काही वर्षांत सातत्याने प्रगती केली आहे; आता मिळालेले पाचवे स्थान हे आजवरचे सर्वोच्च स्थान ठरले आहे.

भारताची यापूर्वी सर्वोत्तम जागतिक क्रमवारी सहावी होती. संघाने मे-जून २०२२ मध्ये 'एफआयएच प्रो लीग'मधील प्रभावी कामगिरीनंतर हे स्थान गाठले होते आणि २०२३ मध्ये पुन्हा एकदा ते मिळवले होते. त्याआधी, टोकियो २०२० ऑलिम्पिक खेळांमध्ये चौथ्या क्रमांकावर राहिल्यानंतर संघ जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर पोहोचला होता. तसेच, २०१८ मध्ये 'एफआयएच महिला हॉकी विश्वचषक' स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारल्यानंतर संघ नवव्या क्रमांकापर्यंत पोहोचला होता, जे त्या काळातील सर्वोच्च स्थान होते.

२०२६ हे वर्ष भारतीय महिला हॉकीसाठी अत्यंत संस्मरणीय ठरले आहे. वर्षाची सुरुवात एफआयएच विश्वचषकासाठी पात्रता मिळवून आणि त्यानंतर 'एफआयएच नेशन्स कप' जिंकून झाली. त्यानंतर, एफआयएच महिला हॉकी विश्वचषकात संघाने पाचवे स्थान पटकावले, जी १९७४ नंतरची या स्पर्धेतील त्यांची सर्वोत्तम कामगिरी ठरली. यानंतर, संघाने ४४ वर्षांची प्रतीक्षा संपवत आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकले आणि लॉस एंजेलिस २०२८ ऑलिम्पिकसाठी थेट पात्रताही मिळवली.

या सर्व यशांमुळे आंतरराष्ट्रीय महिला हॉकीमधील आघाडीच्या संघांमध्ये भारताचे स्थान अधिक बळकट झाले आहे. या ऐतिहासिक टप्प्याबद्दल संघाचे अभिनंदन करताना, हॉकी इंडियाचे अध्यक्ष डॉ. दिलीप तिर्की यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, “FIH जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर पोहोचणे ही भारतीय हॉकीसाठी अभिमानाची गोष्ट आहे. हे आमच्या खेळाडूंच्या आणि सपोर्ट स्टाफच्या कठोर परिश्रमाचे, निष्ठेचे आणि त्यांच्यातील आत्मविश्वासाचे फळ आहे.”

हॉकी इंडियाचे सरचिटणीस भोला नाथ सिंग यांनी पुढे सांगितले, “ही एक ऐतिहासिक कामगिरी असून प्रत्येक भारतीय हॉकी चाहत्यासाठी आनंदाचा क्षण आहे. खेळाडूंनी वर्षभर जबरदस्त जिद्द आणि दृढनिश्चय दाखवला असून, आपल्या मेहनतीचे रूपांतर मोठ्या व्यासपीठांवर यशात केले आहे. 'नेशन्स कप' जिंकण्यापासून ते आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवण्यापर्यंत आणि १९७४ नंतर विश्वचषकात सर्वोत्तम कामगिरी करण्यापर्यंत, त्यांनी भारतीय हॉकीला अभिमान वाटण्यासारख्या अनेक गोष्टी दिल्या आहेत. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर पोहोचणे हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे. आम्हाला खात्री आहे की, या संघामध्ये भविष्यात आणखी मोठी शिखरे गाठण्याची क्षमता आहे.”

जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकाचे ऐतिहासिक स्थान मिळवल्यामुळे भारतीय महिला हॉकी संघाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. आता हा संघ आपली विजयी लय कायम राखण्याचा प्रयत्न करेल आणि देशातील महिला हॉकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या या वर्षातील यशाचा प्रवास पुढे सुरू ठेवेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande