
चंदीगड, 25 नोव्हेंबर (हिं.स.) पंजाब किंग्सने २०२७ च्या इंडियन प्रीमियर लीग हंगामासाठी पारस म्हांम्ब्रे यांची वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. 'एक्स'वरील एका पोस्टमध्ये पंजाब किंग्सने म्हटले आहे, आमच्या संघात तुमचे स्वागत आहे, पारस पाजी!
भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक राहिलेले म्हांम्ब्रे, आता ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू खेळाडू जेम्स होप्स यांची जागा घेतील. म्हांम्ब्रे हे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांच्यासोबत काम करतील. याआधी त्यांनी मुंबई इंडियन्समध्येही एकत्र काम केले आहे. म्हांम्ब्रे यांनी २०२१ ते २०२४ या काळात भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम केले. त्यांनी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासोबत काम केले होते. त्यांच्या कार्यकाळात, २०२३ च्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकात भारताने सलग १० सामने जिंकले होते, मात्र अहमदाबाद येथे झालेल्या अंतिम सामन्यात त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतरच्या वर्षी, भारताने कॅरिबियन बेटांवर टी-२० विश्वचषक जिंकला आणि आयसीसी ट्रॉफीसाठीचा ११ वर्षांचा प्रदीर्घ प्रतीक्षाकाळ संपवला.
फ्रँचायझी क्रिकेटमध्ये, म्हांम्ब्रे यांनी दोनदा मुंबई इंडियन्ससोबत काम केले आहे. भारतीय संघातील कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा मुंबई इंडियन्समध्ये काम केले होते. गेल्या हंगामात मुंबई इंडियन्स नवव्या स्थानावर राहिल्यामुळे फ्रँचायझीने आपल्या कोचिंग स्टाफमध्ये मोठे बदल केले.
पंजाब किंग्स संघ आतापर्यंत दोनदा आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे, परंतु त्यांना एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही. २०१४ मध्ये त्यांना कोलकाता नाईट रायडर्सकडून, तर २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून पराभव पत्करावा लागला होता. २०२६ च्या हंगामात पंजाब किंग्सने दमदार सुरुवात केली होती. त्यांनी सुरुवातीच्या सात सामन्यांत सहा विजय मिळवले होते आणि ते अपराजित राहिले होते. मात्र, त्यानंतर त्यांना सलग सहा सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. लीग टप्प्यातील शेवटचा सामना जिंकूनही, ते केवळ एका गुणाच्या फरकाने प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरले.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे