उदगीरचा शेल्लाळ खून खटला : सातही आरोपींची निर्दोष मुक्तता
लातूर, २६ नोव्हेंबर (हिं.स.) : लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील शेल्लाळ येथील बहुचर्चित खून प्रकरणात उदगीर सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या प्रकरणातील सर्व सातही आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या खटल्यात प्रत्यक्ष
निर्दोष मुक्तता


लातूर, २६ नोव्हेंबर (हिं.स.) : लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील शेल्लाळ येथील बहुचर्चित खून प्रकरणात उदगीर सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या प्रकरणातील सर्व सातही आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असतानाही बचाव पक्षाच्या वतीने करण्यात आलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने हा निर्णय दिला.

शेल्लाळ गावातील या खून प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात सात आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर खटला उदगीर सत्र न्यायालयात सुरू होता. खटल्याच्या सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद करण्यात आला.

आरोपींच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. बालाजी एस. कुटवाडे यांनी न्यायालयात बाजू मांडली. त्यांनी केलेल्या युक्तिवादावर समाधान व्यक्त करत उदगीर येथील सत्र न्यायालयाने सर्व सातही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश दिला.

या खटल्याच्या कामकाजात ॲड. विष्णुदास गुणाले, ॲड. संजय कराड, ॲड. एजाज सय्यद, ॲड. ए. सी. गिड्डे, ॲड. आशिष कुटवाडे, ॲड. स्नेहा बिराजदार आणि ॲड. प्रसाद (बाबा) ढगे यांनी विशेष सहकार्य केले.

शेल्लाळ येथील बहुचर्चित खून प्रकरणातील सातही आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्याने या निकालाची उदगीर तालुक्यात चर्चा होत आहे.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande