
अमरावती, 26 नोव्हेंबर (हिं.स.)
शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) परिसरात एका महिलेचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित महिलेच्या मृतदेहाचे डोके, हात आणि पाय असे अवयव वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. भटक्या कुत्र्यांनी मृतदेहाचे लचके तोडल्यामुळे ही अवस्था झाली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आणि हा घातपात आहे की नैसर्गिक मृत्यू, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे ठाणेदार रोशन शिरसाठ आपल्या ताफ्यासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून पंचनामा सुरू केला आहे. मृत महिलेची ओळख पटवणे आणि तिच्या मृत्यूचे नेमके कारण शोधून काढणे, हे पोलिसांसमोर मोठे आव्हान असून या दिशेने पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी