संविधान दिन साजरा करण्याऐवजी संविधान वाचविण्याची वेळ-सीजेपी
नागपूर, 26 नोव्हेंबर (हिं.स.) । देशात संविधान दिन साजरा करण्याऐवजी संविधान वाचविण्याचा नारा द्यावा लागत आहे, हीच विद्यमान सरकारची कामगिरी आहे, अशा शब्दांत अभिनेता प्रकाश राज यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. देशात भीतीचे राजकारण सुरू असून,
अभिजित दीपके व रांका


नागपूर, 26 नोव्हेंबर (हिं.स.) । देशात संविधान दिन साजरा करण्याऐवजी संविधान वाचविण्याचा नारा द्यावा लागत आहे, हीच विद्यमान सरकारची कामगिरी आहे, अशा शब्दांत अभिनेता प्रकाश राज यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. देशात भीतीचे राजकारण सुरू असून, प्रश्न विचारणाऱ्या तरुणांचा आणि आंदोलनकर्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, सरकारकडे सत्ता असली तरी आमच्याकडे संविधानाची ताकद आहे. याच ताकदीच्या जोरावर देशात बदल घडवून आणू, असा ठाम निर्धार सीजेपीचे नेते अभिजित दीपके याने व्यक्त केला.

नागपुरात आयोजित संविधान दिनाच्या कार्यक्रमात प्रकाश राज, सीजेपीचे नेते अभिजित दीपके आणि आशुतोष रांका यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीकेची झोड उठवली. बेरोजगारी, शिक्षणव्यवस्थेची दुरवस्था, निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि लोकशाही संस्थांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत तिन्ही वक्त्यांनी संविधानाच्या संरक्षणासाठी व्यापक जनजागृती आणि संघर्षाची गरज अधोरेखित केली.

प्रकाश राज यांनी तरुणांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवत सरकारच्या भूमिकेवर प्रहार केला. तरुणांना रोजगार हवा आहे, शाळांमध्ये चांगल्या सुविधा हव्या आहेत, त्यांच्या मूलभूत प्रश्नांची उत्तरे हवी आहेत; मात्र या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी प्रश्न विचारणाऱ्यांनाच घाबरविले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘जंतरमंतर बंद केले, पण आता संपूर्ण देशच जंतरमंतर झाला आहे. ही लढाई दीर्घकाळ चालणारी आहे. आम्ही कायदा हातात घेण्यासाठी नव्हे, तर लोकशाही मार्गाने तुम्हाला सत्तेबाहेर खेचण्यासाठी आलो आहोत,’ असा इशाराही त्यांनी दिला.

आपण नेता बनण्यासाठी या आंदोलनात सहभागी झालेलो नाही, तर नव्या पिढीतील तरुणांना नेतृत्वाची संधी मिळावी, त्यांच्यातून नवे नेतृत्व घडावे, हा आपला उद्देश असल्याचेही प्रकाश राज यांनी स्पष्ट केले.

निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर सवाल

अभिजित दीपके यांनी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित करून निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महाराष्ट्रात मतदानाच्या शेवटच्या तासात वाढलेल्या मतदानाची माहिती सार्वजनिक का केली जात नाही, असा सवाल त्यांनी केला. मतदारयाद्यांमधून १३ कोटी नावे वगळल्याचा आरोप करत या प्रक्रियेबाबत पारदर्शकता आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

देशातील बेरोजगारी, शाळांमधील अपुऱ्या सुविधा आणि महिलांच्या राजकीय प्रतिनिधित्वाचा मुद्दाही त्यांनी मांडला. महिला आरक्षण ३३ टक्क्यांपुरते मर्यादित न ठेवता ते ५० टक्के करण्याची मागणी त्यांनी केली. अटक आणि तुरुंगवासाची भीती दाखवून लोकशाहीसाठीचा आवाज दाबता येणार नाही, असे सांगत, ‘आम्हाला अटक केली तर लोकशाही वाचविण्यासाठी तुम्ही संघर्ष सुरू ठेवा,’ असे आवाहन त्यांनी तरुणांना केले.

नागपूर आंबेडकरांचा वैचारिक गड : आशुतोष रांका

आशुतोष रांका यांनी नागपूरच्या वैचारिक आणि ऐतिहासिक ओळखीचा संदर्भ देत नागपूर हे केवळ संघाचे नव्हे, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचेही महत्त्वपूर्ण केंद्र असल्याचे ठामपणे सांगितले. ‘जय भीम’ हा केवळ घोषवाक्य नसून समाजातील भेदभाव मिटवून समानतेचा विचार रुजविणारा नारा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संविधान कितीही चांगले असले, तरी त्याची अंमलबजावणी करणारे लोक चांगले असणे आवश्यक आहे, या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची आठवण करून देत त्यांनी संविधान वाचविण्याबरोबरच देशातील लोकशाही मूल्ये आणि सामाजिक एकात्मता टिकविण्याची गरज व्यक्त केली. २०४७ मध्ये भारत कसा असेल, हे आजचे तरुणच ठरवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

संविधान, लोकशाही, सामाजिक समता आणि तरुणांचे भविष्य या मुद्द्यांभोवती केंद्रित झालेल्या या कार्यक्रमातून तिन्ही वक्त्यांनी संविधानाच्या मूल्यांच्या रक्षणासाठी जागरूक राहण्याचा आणि लोकशाही मार्गाने संघर्ष करण्याचा संदेश दिला.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande