
संसदेचे विशेष कामकाज ३० नोव्हेंबरपासून; २ डिसेंबरला राज्यसभेची बैठक
नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर (हिं.स.) : महिला आरक्षणाची अंमलबजावणी आणि लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना (परिसीमन) या मुद्द्यांवर देशातील राजकीय वातावरण तापले असतानाच केंद्र सरकारने संसदेची दोन्ही सभागृहे पुन्हा बोलावण्याची तयारी केली आहे. त्यानुसार लोकसभेचे कामकाज सोमवार, ३० नोव्हेंबर रोजी, तर राज्यसभेचे कामकाज बुधवार, २ डिसेंबर रोजी सुरू होणार आहे. सरकारी कामकाजाच्या गरजेनुसार दोन्ही सभागृहांचे कामकाज ३ डिसेंबरपर्यंत चालण्याची शक्यता आहे.
केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी गुरुवारी (२६ नोव्हेंबर) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करून ही माहिती दिली. आवश्यक सरकारी कामकाज पूर्ण करण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांना दोन्ही सभागृहांच्या बैठका पुन्हा बोलावण्याची विनंती करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, या बैठकीत नेमकी कोणती विधेयके किंवा विषय चर्चेला येणार, याबाबत सरकारने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.
महिला आरक्षण आणि परिसीमन विधेयक पुन्हा चर्चेत
या संसदीय बैठकांकडे देशाचे लक्ष लागण्याचे प्रमुख कारण म्हणजे महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेचा मुद्दा. एप्रिल २०२६ मध्ये लोकसभेत मांडण्यात आलेले संविधान (१३१वे दुरुस्ती) विधेयक आवश्यक दोन-तृतीयांश बहुमत मिळवण्यात अपयशी ठरले होते. महिला आरक्षणाची अंमलबजावणी मतदारसंघांच्या परिसीमनाशी जोडण्याचा या विधेयकाचा प्रस्ताव होता.या विधेयकाच्या अपयशानंतर लोकसभेच्या सदस्यसंख्येत वाढ, राज्यनिहाय प्रतिनिधित्वाचे प्रमाण आणि महिला आरक्षणाची अंमलबजावणी या विषयांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. आता सरकार या विषयाशी संबंधित विधेयक नव्याने आणणार का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
लोकसभेच्या जागा ५० टक्क्यांनी वाढवण्याचा प्रस्ताव ?
चर्चेत असलेल्या प्रस्तावानुसार लोकसभेच्या एकूण जागांमध्ये ५० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा पर्याय विचाराधीन असल्याचे वृत्त आहे. त्याचवेळी १९७१ च्या जनगणनेच्या आधारे राज्यांमधील लोकसभा जागांचे विद्यमान परस्पर प्रमाण कायम ठेवण्याचा प्रस्तावही चर्चेत आहे. मात्र, या प्रस्तावाबाबत अंतिम निर्णय झाल्याची अधिकृत माहिती उपलब्ध नाही.या मुद्द्याला विशेष राजकीय महत्त्व आहे. कारण लोकसभेतील जागांची वाढ, राज्यांचे प्रतिनिधित्व आणि दक्षिणेकडील राज्यांच्या राजकीय प्रभावाचा समतोल यावरून केंद्र आणि विरोधकांमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसची रणनीती बैठक; विरोधकांकडून सरकारला घेरण्याची तयारी
संसदेच्या आगामी कामकाजाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनेही राजकीय हालचालींना वेग दिला आहे. पक्षाच्या संसदीय रणनीती गटाची शुक्रवारी सायंकाळी ४.३० वाजता दिल्लीत बैठक होणार असून, त्यात आगामी संसदीय कामकाजात सरकारला कोणत्या मुद्द्यांवर जाब विचारायचा, याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.दरम्यान, मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेवरून (एसआयआर) विरोधी पक्षांनी यापूर्वीच आक्षेप नोंदवले आहेत. मतदार यादीतील बदल, मतदारांच्या हक्कांचे संरक्षण आणि पुनरीक्षण प्रक्रियेतील पारदर्शकता या मुद्द्यांवर संसदेत चर्चा घडवून आणण्याची मागणी विरोधकांकडून होऊ शकते.
सरकारच्या भूमिकेकडे देशाचे लक्ष
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतही आगामी संसदीय कामकाजाच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याचे वृत्त आहे. मंत्र्यांना संसदेच्या आगामी बैठकीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. २७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या संभाव्य मंत्रिमंडळ बैठकीत संबंधित प्रस्तावांबाबत पुढील दिशा स्पष्ट होण्याची शक्यता आहे.एकीकडे महिला आरक्षणाची अंमलबजावणी, दुसरीकडे लोकसभेच्या जागांची पुनर्रचना आणि तिसरीकडे SIR प्रक्रियेवरील विरोधकांचे आक्षेप, अशा अनेक संवेदनशील मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर संसदेचे हे अल्पकालीन कामकाज महत्त्वाचे ठरणार आहे. सरकार नेमका कोणता अजेंडा मांडते आणि विरोधक त्याला कशा प्रकारे प्रत्युत्तर देतात, याकडे आता देशाचे लक्ष लागले आहे.
--------------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी