शिवाजीनगर न्यायालयाबाहेर गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरणातील सहा आरोपींना पोलीस कोठडी
पुणे, 26 नोव्हेंबर (हिं.स.)। शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या गेट क्रमांक चारबाहेर गोळीबार करून कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयाने २ डिसेंबर २०२६ पर्यंत सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे
शिवाजीनगर न्यायालयाबाहेर गोळीबार


पुणे, 26 नोव्हेंबर (हिं.स.)।

शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या गेट क्रमांक चारबाहेर गोळीबार करून कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयाने २ डिसेंबर २०२६ पर्यंत सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. जुन्या वैमनस्यातून आणि खुनाचा बदला घेण्याच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आल्याचे प्राथमिक पोलीस तपासात समोर आले आहे.

बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट क्रमांक चारबाहेर ही घटना घडली. दोन दुचाकींवरून आलेल्या हल्लेखोरांनी ३५ वर्षीय मंदार मारुती किवळे याच्यावर गोळीबार केला. त्यानंतर कोयत्याने सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केले. या घटनेमुळे न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली होती. जखमी मंदार किवळे याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

या हल्ल्यामागे २०२५ मध्ये कात्रज येथील संतोषनगर परिसरात झालेल्या शुभम चव्हाण याच्या खुनाची पार्श्वभूमी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या खुनाच्या गुन्ह्यात मंदार किवळे आरोपी होता. नुकताच तो जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता. त्यानंतर शुभम चव्हाण याचा भाऊ अक्षय चव्हाण याने जुन्या वैमनस्यातून आणि भावाच्या खुनाचा बदला घेण्याच्या उद्देशाने साथीदारांच्या मदतीने मंदार किवळे याच्यावर हल्ला केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणी पुणे पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपासादरम्यान दौंड आणि पुण्यातील डेक्कन परिसरातून पाच प्रौढ आरोपी आणि एका अल्पवयीन मुलासह सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये अक्षय सुभाष चव्हाण, अमोल रामचंद्र चव्हाण, स्वप्निल बाजीराव गवळी, ओंकार संतोष पवार आणि सूरज साधू मालेकर या आरोपींचा समावेश आहे.

दरम्यान, ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर आरोपींना गुरुवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. या हल्ल्याचे नेमके नियोजन कसे करण्यात आले, हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली शस्त्रे कोठून आणली, गोळीबारासाठी वापरलेले शस्त्र कोणाकडून मिळवले तसेच या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी आरोपींच्या कोठडीची मागणी केली.

न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपींना २ डिसेंबर २०२६ पर्यंत सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या कालावधीत हल्ल्याचा कट, आरोपींचे परस्पर संबंध, शस्त्रांची उपलब्धता आणि गुन्ह्यातील इतर सहभागींचा शोध घेण्यावर पोलिसांचा भर राहणार आहे.

न्यायालयासारख्या अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या परिसराच्या प्रवेशद्वाराबाहेरच गोळीबार आणि कोयत्याने हल्ला झाल्याने पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande