निर्जलीकरणाचा त्रास; शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
डॉक्टरांकडून विश्रांती आणि प्रवास टाळण्याचा सल्ला प्रकृती स्थिर असल्याची सुप्रिया सुळेंची माहिती मुंबई, 26 नोव्हेंबर (हिं.स.) : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांना निर्जलीकरणाचा त्रास झाल्यान
शरद पवार


डॉक्टरांकडून विश्रांती आणि प्रवास टाळण्याचा सल्ला

प्रकृती स्थिर असल्याची सुप्रिया सुळेंची माहिती

मुंबई, 26 नोव्हेंबर (हिं.स.) : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांना निर्जलीकरणाचा त्रास झाल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. २६ नोव्हेंबर रोजी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची प्रकृती ठीक असून डॉक्टरांनी त्यांना प्रवास कमी करण्यासह पुरेशी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्सवरील पोस्टद्वारे दिली.

शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या कामाच्या आवडीचाही उल्लेख केला. पूर्ण आराम करण्याचा सल्ला देऊनही ते ऐकत नाहीत. त्यांना कामात रमून जायला आवडते, असे त्यांनी म्हटले. तसेच, 'डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने बाबांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांना प्रवास कमी करण्याचा तसेच विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. पण बाबा ऐकत नाहीत. त्यांना कामात रमून जायला आवडते,' असे सुप्रिया सुळे यांनी पोस्टमध्ये नमूद केले. दरम्यान, शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत काळजी व्यक्त करणाऱ्या आणि लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे सुप्रिया सुळे यांनी आभार मानले. 'बाबांची तब्येत ठीक आहे. आपण सर्वांनी व्यक्त केलेल्या काळजीबद्दल आणि दिलेल्या शुभेच्छांबद्दल मनापासून आभार,' असेही त्यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी 2 नोव्हेंबर रोजी खोकला आणि छातीत दुखण्याचा त्रास जाणवू लागल्याने शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी त्यांनी ग्रामीण भागाचा दौरा सुरू केला होता. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना हा दौरा अर्धवट सोडावा लागला होता. रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार घेतल्यानंतर ते मुंबईत परतले. त्यानंतर ४ नोव्हेंबर रोजी त्यांना पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्यावेळी छातीत संसर्ग झाल्याचे निदान झाले होते. उपचारानंतर प्रकृतीत वेगाने सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. पुढील उपचार घरीच सुरू ठेवण्याचा सल्ला देण्यात आल्याची माहिती ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉ. प्रतीत समदानी यांनी दिली होती.

पवार यांच्या वयाचा विचार करता त्यांना अतिरिक्त खबरदारी घेण्यास आणि पुरेशी विश्रांती घेण्यास सांगण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.आता 26 नोव्हेंबर रोजी निर्जलीकरणाच्या त्रासामुळे शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत राजकीय वर्तुळासह समर्थकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.--------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande