
नवी दिल्ली , 27 नोव्हेंबर (हिं.स.)।देशाचे माजी सरन्यायाधीश (सीजेआय) बी. आर. गवई यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून उच्च न्यायपालिकेतील न्यायाधीशांच्या नियुक्त्या आणि बदल्यांमध्ये गुणवत्ता, विविधता आणि सर्वसमावेशकतेच्या तत्त्वांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. शिफारशी करताना समाजातील इतर घटकांकडे दुर्लक्ष करून एका विशिष्ट समुदायाला प्राधान्य दिले जात असल्याचा आरोपही माजी सरन्यायाधीशांनी केला आहे.
माजी सरन्यायाधीश गवई यांनी हे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनाही पाठवले आहे. बी. आर. गवई हे सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमचे सदस्य होते. त्यानंतर त्यांनी भारताचे सरन्यायाधीश म्हणून कॉलेजियमचे नेतृत्वही केले होते. आपण एक चिंतित नागरिक आणि माजी सरन्यायाधीश या नात्याने हे पत्र लिहित असल्याचे गवई यांनी म्हटले आहे. त्यांनी एका चिंताजनक प्रवृत्तीकडे लक्ष वेधले असून, त्यात सुधारणा करण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी तातडीने पावले उचलण्याची गरज व्यक्त केली आहे.
२७ नोव्हेंबर रोजी लिहिलेल्या या पत्रात गवई यांनी राष्ट्रपतींना या विषयाकडे लक्ष देऊन योग्य ती पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. भारतीय लोकशाहीच्या सर्वांत महत्त्वाच्या स्तंभांपैकी एक असलेल्या न्यायव्यवस्थेत 'समान प्रतिनिधित्व' या घटनात्मक कर्तव्याचे पालन व्हावे, असे त्यांनी म्हटले आहे. कॉलेजियममधील आपल्या कार्यकाळाची आठवण करून देताना, आपण नेहमीच विविधता आणि सर्वसमावेशकतेच्या तत्त्वांचे पालन केल्याचेही गवई यांनी नमूद केले आहे.
उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी शिफारशी करताना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्याक, महिला तसेच समाजातील इतर वंचित घटकांना योग्य प्रतिनिधित्व मिळेल, याची आपण नेहमीच काळजी घेतल्याचे माजी सरन्यायाधीशांनी सांगितले.
मात्र, अलीकडच्या काळात काही चिंताजनक घटना समोर आल्या असून, त्यातून या तत्त्वांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येते, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
गवई यांनी आरोप केला की, न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी शिफारशी करताना केवळ एका समुदायाला खूश करण्यावर आणि त्यांना लाभ मिळवून देण्यावर लक्ष केंद्रित केले जात असल्याने मला तीव्र चिंता वाटत आहे.
'उच्चवर्णीय' समाजातील उमेदवारांचा न्यायिक नियुक्त्यांमध्ये समावेश करण्यास आपला कोणताही आक्षेप नसल्याचे गवई यांनी स्पष्ट केले. मात्र, समाजातील सर्व घटकांमध्ये योग्य संतुलन राखण्याचा आपला नेहमीच प्रयत्न राहिला असल्याचे त्यांनी सांगितले.
संसदीय आकडेवारीचा दाखला देताना माजी सरन्यायाधीशांनी सांगितले की, मार्च २०२५ मध्ये केंद्रीय कायदेमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१८ पासून नियुक्त करण्यात आलेल्या उच्च न्यायालयांच्या ७१५ न्यायाधीशांपैकी केवळ २२ न्यायाधीश अनुसूचित जाती, १६ अनुसूचित जमाती, ८९ इतर मागासवर्गीय आणि ३७ अल्पसंख्याक समुदायांतील होते.गवई यांनी पुढे सांगितले की, जानेवारी २०२१ ते जानेवारी २०२६ या कालावधीत न्यायिक नियुक्त्यांमध्ये उच्चवर्णीय समाजाचा वाटा सुमारे ८० टक्के होता, तर इतर मागासवर्गीयांचे प्रतिनिधित्व केवळ १४ टक्क्यांच्या आसपास होते.
सर्वोच्च न्यायालयातील नियुक्त्यांमध्येही एका विशिष्ट समुदायाच्या प्रतिनिधित्वाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येत पाच टक्क्यांपेक्षाही कमी वाटा असलेल्या एका समुदायाला अलीकडच्या काळात सर्वोच्च न्यायालयात ४० टक्क्यांहून अधिक प्रतिनिधित्व मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
सर्वोच्च न्यायालयातील नियुक्त्यांमध्ये जातीनिहाय नोंदी ठेवल्या जात नाहीत, असा प्रश्न उपस्थित करत गवई यांनी या संदर्भातील आकडेवारी उपलब्ध नसणे हेदेखील समस्येचे एक महत्त्वाचे कारण असल्याचे म्हटले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode