
* महाराष्ट्राला सर्वाधिक 1,75,24,129 रुपये इतका निधी
* जैवविविधता संवर्धनातून औषधी वनस्पतींचा व्यावसायिक उपयोग करण्यासाठी प्रयत्न
नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर (हिं.स.) -
राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाने (एनबीए) 28 राज्ये आणि 4 केंद्रशासित प्रदेशांमध्ये जैवविविधता संवर्धन आणि जैविक संसाधनांच्या शाश्वत वापरास प्रोत्साहन देण्यासाठी 13.76 कोटी रुपयांचा निधी वितरित केला. हा निधी, औषधी वनस्पती आणि इतर वनस्पती-आधारित जैविक संसाधनांच्या व्यावसायिक वापरासाठी आयुष उत्पादने बनवणाऱ्या कंपन्यांकडून प्राप्त झालेल्या लाभवाटप ['ॲक्सेस अँड बेनिफिट शेअरिंग' (एबीएस)] योगदानाचा एक भाग आहे.
हे योगदान एकूण 234 वनस्पती प्रजातींच्या वापराशी संबंधित तीन अर्जांसाठी देण्यात आले आहे. 234 वनस्पती प्रजातींपैकी, गुग्गुळ, अश्वगंधा, भृंगराज, पुनर्नवा, सर्पगंधा, कालमेघ, काळी मिरी, आवळा, गोखुरा आणि शालपर्णी या दहा प्रजातींच्या वापरापोटी एकूण 13.76 कोटी रुपयांच्या निधीपैकी 6.45 कोटी रुपयांचा लाभ-वाटप निधी प्राप्त झाला आहे. निधीचे वाटप झालेल्या 15 राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश असून महाराष्ट्राला सर्वाधिक 1,75,24,129 रुपये इतका निधी मिळाला आहे.
एबीएस यंत्रणा त्यांच्या व्यावसायिक उपयोगातून मिळणारा आर्थिक लाभ जैवविविधता संवर्धन, शाश्वत पद्धतीने वनस्पती संकलन आणि या मौल्यवान जैविक संसाधनांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी एक साधन उपलब्ध करून देते.
औषधी वनस्पती या भारताच्या जैविक संपत्तीचा, पारंपरिक आरोग्य सेवा व्यवस्थेचा आणि ग्रामीण उपजीविकेचा अविभाज्य भाग आहेत. या वनस्पतींचे संकलन, लागवड, प्रक्रिया आणि व्यापार यामध्ये सहभागी असलेल्या समुदायांना त्यांचा आधार मिळतो. त्याचबरोबर या वनस्पतींशी संबंधित पारंपरिक ज्ञान हा भारताच्या सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा भाग आहे. औषधी वनस्पतींची लागवड, मूल्यवर्धन आणि रोजगारनिर्मितीला प्रोत्साहन देणाऱ्या राष्ट्रीय आयुष अभियान, राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाचे कार्यक्रम आणि प्रधानमंत्री वन धन योजना यांसारख्या सरकारच्या उपक्रमांना हे प्रयत्न पूरक ठरत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी