
नागपूर, २७ नोव्हेंबर (हिं.स.) : घरातील पाणी घरात, शेतातील पाणी शेतात आणि गावात पडणारे पावसाचे पाणी त्याच गावात साठविण्याचे नियोजन झाले पाहिजे. पाण्याचा एकही थेंब वाया जाता कामा नये. प्रत्येक थेंबाचे संवर्धन करून जलसाठा वाढविणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
मध्य भारतातील सर्वांत मोठे कृषी प्रदर्शन असलेल्या ‘ॲग्रोव्हिजन २०२६’ आणि जल संमेलनाचे उद्घाटन शुक्रवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अमरावती मार्गावरील मैदानावर झाले. यंदा ‘दुष्काळाचा सामना : जलव्यवस्थापन आणि पीक नियोजन’ ही प्रदर्शनाची मुख्य संकल्पना असून, गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन सोहळा पार पडला. जल संमेलनाचे उद्घाटन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते झाले. यावेळी नितीन
गडकरी म्हणाले की, सिंचनाची कमतरता, कापसाच्या वाढत्या उत्पादन खर्चासह शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने १७ वर्षांपूर्वी ॲग्रोव्हिजनची सुरुवात करण्यात आली. शेतकरी केवळ अन्नदाताच नव्हे, तर ऊर्जादाता, इंधनदाता आणि हायड्रोजनदाताही व्हावा, हे स्वप्न होते. आज ते प्रत्यक्षात साकार होताना समाधान वाटते.
शेतीचा उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. पुढील ॲग्रोव्हिजनपूर्वी किमान पाच हजार शेतकऱ्यांपर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञान पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवावे. शेतकऱ्यांना प्रशिक्षण, ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून त्यांचा आत्मविश्वास वाढविणे, हे ॲग्रोव्हिजनचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात आणि कोणत्याही शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ येऊ नये, यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे गडकरी यांनी नमूद केले. बिहार सरकारने नदीतील गाळ काढून त्याचा रस्ते बांधकामासाठी विनारॉयल्टी वापर करण्यास परवानगी दिली आहे. संजय राठोड यांनी केलेल्या मागणीनुसार महाराष्ट्र सरकारसोबतही अशाच प्रकारचा करार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
कृषी राज्यमंत्री आशीष जायसवाल यांनी ॲग्रोव्हिजन हे शेतकऱ्यांच्या प्रगतीचे इंजिन ठरल्याचे सांगितले. या उपक्रमाने नकारात्मकतेचे सकारात्मकतेत रूपांतर केले आहे. तामसवाडा मॉडेलमुळे जलसंवर्धनाच्या कामांना नवी प्रेरणा मिळाली असून, राज्यात मोठ्या प्रमाणावर नाला खोलीकरण आणि जलसंधारणाची कामे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
जलसंवर्धनाला प्राधान्य देण्याचे आवाहन करताना संजय राठोड म्हणाले की, शासनाकडून बांधण्यात येणाऱ्या बंधाऱ्यांची योग्य देखभाल न झाल्याने त्यांची पाणी साठविण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे शेतकऱ्यांनीही बंधाऱ्यांच्या संवर्धनाची जबाबदारी स्वीकारून नियमित देखभाल करावी. महाराष्ट्र सरकारनेही जलसंवर्धनासाठी बिहारच्या धर्तीवर करार करावा, अशी मागणी त्यांनी गडकरी यांच्याकडे केली.
माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी किसान संरक्षण आयोगाची स्थापना आणि शेतकऱ्यांच्या तक्रारींच्या त्वरित निवारणासाठी फास्ट ट्रॅक न्यायालयांची व्यवस्था करण्याची मागणी केली.
कार्यक्रमात ऊस शेती आणि प्रक्रिया तंत्रज्ञानावरील ‘ऊस : शेती एवं प्रक्रिया की संपूर्ण तांत्रिक जानकारी’ या पुस्तकाचे गडकरी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी कृषी राज्यमंत्री आशीष जायसवाल, सुधीर मुनगंटीवार, आयसीआरआयएसएटीचे महासंचालक डॉ. हिमांशू पाठक, कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, ॲग्रोव्हिजनचे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शन २७ ते ३० नोव्हेंबरदरम्यान दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे. दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत शेतकऱ्यांसाठी विविध विषयांवरील कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. आधुनिक कृषी तंत्रज्ञान, नवीन उपकरणे, संशोधन, पीक पद्धती आणि शेतीपूरक व्यवसायांची माहिती या प्रदर्शनातून मिळणार आहे.
-----------------------------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी