
- मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या, जनतेच्या कष्टाच्या पैशातून उभारला आलिशान ‘शीश महल’
नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर (हिं.स.)। दिल्ली सरकारने माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पूर्वीच्या शासकीय निवासस्थानाला म्हणजेच ‘शीश महल’ला शुक्रवारी प्रसारमाध्यमांसाठी खुले केले. ‘शीश महल’मध्ये ठेवण्यात आलेल्या महागड्या फर्निचरचे त्यांच्या किमतींसह प्रदर्शन करण्यात आले आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी निवेदन जारी करून ‘शीश महल’बाबत सांगितले की, दिल्लीच्या जनतेनंतर आता पंजाबच्या जनतेनेही पाहिले पाहिजे की, जनतेच्या कष्टाच्या पैशातून कशा प्रकारे आलिशान शीश महल उभारण्यात आला. या संपूर्ण प्रकरणाचे सत्य दिल्ली आणि पंजाबच्या जनतेसमोर आले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
दिल्लीचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री प्रवेश साहिब सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, दिल्लीच्या जनतेचा पैसा म्हणजेच करदात्यांचा पैसा कुठे आणि किती खर्च करण्यात आला, याचा संपूर्ण हिशेब प्रत्येक सरकारने दिला पाहिजे. दिल्लीच्या विकासासाठी खर्च होणारा जनतेचा पैसा मागील मुख्यमंत्र्यांनी कोणत्या प्रकारचे फर्निचर खरेदी करण्यासाठी खर्च केला, हे जाणून घेण्याचा जनतेला अधिकार आहे. यामागे आमचा कोणताही राजकीय हेतू नाही. येथे नमूद केलेल्या प्रत्येक रकमेबरोबर आम्ही त्याचा बिल क्रमांक आणि पावती क्रमांकही दिला आहे. हे संपूर्ण घर पूर्वी जसे होते तसेच आहे. यातील कोणतीही वस्तू इकडून तिकडे करण्यात आलेली नाही. त्यामुळे जनतेचा पैसा कुठे खर्च झाला, हे जाणून घेण्याचा जनतेला पूर्ण अधिकार आहे.
दिल्लीचे पर्यटन मंत्री कपिल मिश्रा यांनी ‘शीश महल’मध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आज तुमच्या चित्रणाच्या माध्यमातून संपूर्ण देश पाहणार आहे की, दिल्लीच्या जनतेचा पैसा कशा प्रकारे वाया घालवण्यात आला आणि लुटण्यात आला. कोट्यवधी रुपयांच्या वस्तू खरेदी करण्यात आल्या असून जगभरातील विविध देशांतून त्या मागवण्यात आल्या आहेत, हे संपूर्ण देशाने तुमच्या चित्रणाच्या माध्यमातून पाहावे, अशी माझी इच्छा आहे. कोरोना काळात जेव्हा जनता प्राणवायूच्या कमतरतेशी झुंजत होती, तेव्हा केजरीवाल कोट्यवधी रुपयांच्या शीश महलचे बांधकाम करत होते, असेही त्यांनी सांगितले.
मंत्री कपिल मिश्रा म्हणाले की, दिल्लीच्या जनतेचा पैसा लुटून परदेशातून कोट्यवधी रुपयांच्या वस्तू शीश महलमध्ये आणण्यात आल्या आणि ऐषआरामासाठी त्यांचा वापर करण्यात आला. जो माणूस आपण एका खोलीच्या घरात राहणार असल्याचे सांगत होता, त्याच माणसाने जगातील विविध देशांतून कोट्यवधी रुपयांच्या वस्तू आणून ठेवल्या आहेत. जनतेच्या कराच्या पैशातून कशा प्रकारे ऐषआराम करण्यात आला, याचे पुरावे संपूर्ण देश पाहत आहे. ‘शीश महल’मधील लाखो रुपयांची चिमणी इटलीतून आणण्यात आली आहे. ३१ लाख रुपयांची क्रॉकरी जगातील वेगवेगळ्या देशांतून मागवण्यात आली आहे. फ्रिजमध्ये इंटरनेट आणि दूरचित्रवाणीची सुविधाही आहे. कोरोना काळात केजरीवाल यांनी दिल्लीच्या जनतेसोबत हे पाप केले, असा आरोपही त्यांनी केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule