
नवी दिल्ली , 27 नोव्हेंबर (हिं.स.)।रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी मॉस्को येथे आयोजित ‘एआय जर्नी २०२६’ या परिषदेदरम्यान १६ वर्षीय भारतीय उद्योजक राउल जॉन अजू यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले.कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) क्षेत्रात अजू करत असलेल्या कामाची प्रशंसा करताना पुतिन यांनी त्याचा संबंध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाशी जोडला.
वृत्तानुसार, परिषदेदरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि कझाकस्तानचे राष्ट्राध्यक्ष कासिम-जोमार्ट तोकायेव यांनी युवा नवोन्मेषकांशी संवाद साधला. यावेळी एआय रिअल्म टेक्नॉलॉजीचे संस्थापक आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) राउल जॉन अजू यांची पुतिन यांच्याशी ओळख करून देण्यात आली. या संवादादरम्यान पुतिन यांनी अजू यांच्या कामाचे कौतुक केले. स्वतःचे तांत्रिक उपाय विकसित करणारे युवा नवोन्मेषक ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाची उद्दिष्टे साध्य करण्यात महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले.
पुतिन यांनी अजू यांना सांगितले की, त्यांचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’च्या आवाहनाला प्रत्यक्षात उतरवण्यास मदत करत आहे. कारण अशा उपक्रमांमुळे तरुणांना स्वतःचे तांत्रिक उपाय शोधण्यासाठी आणि त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रोत्साहन मिळते.पुतिन यांची ही टिप्पणी अशा वेळी आली आहे, जेव्हा काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कार्यालयाने (यूएसटीआर) उत्पादन क्षेत्रातील अतिरिक्त क्षमता आणि उत्पादनाचा आढावा घेणारा अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालात ‘मेक इन इंडिया’सह भारताच्या उत्पादन आणि निर्यातविषयक धोरणांवर टीका करण्यात आली होती. आपल्या कलम ३०१ अंतर्गत केलेल्या चौकशीच्या अहवालात यूएसटीआरने म्हटले होते की, भारताने जागतिक स्तरावरील चिंतांचे निराकरण न करता उत्पादन क्षमता आणि उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होईल, अशी अनेक पावले उचलली आहेत.
या अहवालात विशेषतः पोलाद, सौर ऊर्जा, आरोग्य आणि माहिती व दळणवळण तंत्रज्ञान (आयसीटी) क्षेत्रांमध्ये भारताच्या ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमासह उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन योजना (पीएलआय), ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रम आणि इंडिया ब्रँड इक्विटी फाउंडेशन यांचा अतिरिक्त उत्पादन क्षमता वाढवणारे रे उपाय म्हणून उल्लेख करण्यात आला होता.
ऑनलाइन विश्वात ‘राउल द रॉकस्टार’ आणि ‘एआय किड ऑफ इंडिया’ या नावांनी ओळखले जाणारे अजू हे केरळमधील किशोरवयीन उद्योजक आहेत. विशेष म्हणजे, पारंपरिक अभियांत्रिकी किंवा संगणक विज्ञान शाखेऐवजी वाणिज्य शाखेची पार्श्वभूमी असूनही त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
वृत्तानुसार, वयाच्या अवघ्या नऊव्या वर्षी त्यांना तंत्रज्ञानाची आवड निर्माण झाली. स्वतःहून शिकणे आणि विविध प्रयोग करणे या माध्यमातून सुरू झालेला त्यांचा प्रवास पुढे एआय प्रकल्प, शैक्षणिक उपक्रम आणि मोठ्या ऑनलाइन समुदायापर्यंत पोहोचला.अजू यांनी नॉर्थ एडापल्ली येथील जीएचएसएस शाळेतून बारावीचे वाणिज्य शाखेतील शिक्षण पूर्ण करतानाच एआय प्रकल्पांवर काम सुरू ठेवले. एआय रिअल्म टेक्नॉलॉजीजचे संस्थापक आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून ते विविध एआय उत्पादने आणि व्यावहारिक तांत्रिक उपाय विकसित करतात.
त्यांच्या प्रमुख प्रकल्पांमध्ये थिंकक्राफ्ट, रेस्क्यू एआय आणि मीबॉट यांसारख्या साधनांचा समावेश आहे. याशिवाय, ते थिंकक्राफ्ट अकादमीशीही संबंधित आहेत. या माध्यमातून विद्यार्थी आणि व्यावसायिकांना नव्या तंत्रज्ञानाची ओळख करून दिली जाते.सॉफ्टवेअर विकसित करण्याबरोबरच तांत्रिक पार्श्वभूमी नसलेल्या लोकांनाही एआय तंत्रज्ञान सहज समजावे आणि त्याचा वापर करता यावा, यासाठी अजू यांनी अनेक कार्यशाळांचे आयोजन केले आहे. आतापर्यंत त्यांनी आठ टेडएक्स व्याख्याने दिली आहेत.आयआयटी, विविध विद्यापीठे आणि शाळांमध्येही त्यांनी मार्गदर्शनपर सत्रे घेतली आहेत. त्यांच्या या कार्यामुळे सोशल मीडियावर त्यांचे पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode