अफगाणिस्तानात शाळेजवळ भीषण स्फोट; ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू, ९७ जखमी
काबूल, 28 नोव्हेंबर (हिं.स.)। अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील कुनार प्रांतात शनिवारी सकाळी एका शाळेजवळ झालेल्या भीषण स्फोटात सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर अन्य ९७ जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, म
AFGHANISTAN KUNAR EXPLOSION NEAR SCHOOL STUDENTS K


काबूल, 28 नोव्हेंबर (हिं.स.)। अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील कुनार प्रांतात शनिवारी सकाळी एका शाळेजवळ झालेल्या भीषण स्फोटात सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर अन्य ९७ जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मृत आणि जखमींची संख्या प्राथमिक असून तपासानंतर त्यात बदल होऊ शकतो.

आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी अल जझीराच्या वृत्तानुसार, कुनार प्रांतीय रुग्णालयाचे प्रमुख मौला दाद यांनी सांगितले की, या स्फोटात सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून ९७ जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू असून सध्या ही प्राथमिक आकडेवारी आहे.

कुनारच्या माहिती व संस्कृती विभागाचे संचालक मौलवी समी-उल-हक यांच्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास पूर्व अफगाणिस्तानातील कुनार प्रांताच्या सेर परिसरात एका माध्यमिक शाळेजवळ असलेल्या घरात हा स्फोट झाला. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ज्या घरात स्फोट झाला, त्या घराचा वापर खाणकामाशी संबंधित लोक करत होते. या ठिकाणी खाणकामासाठी वापरण्यात येणारी स्फोटके साठवून ठेवण्यात आली होती, अशी माहिती समोर आली आहे.

मात्र, स्फोटाचे नेमके कारण आणि त्यामध्ये वापरण्यात आलेल्या सामग्रीबाबत सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. स्थानिक प्रशासनानेही या घटनेत झालेल्या एकूण नुकसानीची अधिकृत आकडेवारी अद्याप जाहीर केलेली नाही. पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या कुनार प्रांतात तपास पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. अधिकारी स्फोटाची कारणे आणि अपघाताशी संबंधित परिस्थितीचा तपास करत आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतर घटनेबाबत अधिक माहिती समोर येऊ शकते, असे प्रशासनाने सांगितले.

उल्लेखनीय म्हणजे, याच वर्षी ऑगस्ट महिन्यात राजधानी काबूलमधील एका शाळेच्या परिसरात हातबॉम्बने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात ९ ते १४ वर्षे वयोगटातील ४० हून अधिक मुले जखमी झाली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande