
कराची, २८ नोव्हेंबर (हिं.स.) पाकिस्तानमधील कराची येथे बांधकाम सुरू असलेली सहा मजली इमारत कोसळल्याने मृतांचा आकडा नऊवर पोहोचला आहे. शनिवारी सकाळी बचाव पथकाने ढिगाऱ्याखालून आणखी एक मृतदेह बाहेर काढला. मृताची ओळख ३० वर्षीय मुहम्मद अली अशी पटली आहे. अपघात झाल्यापासून बचावकार्य सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ११ जण अद्याप बेपत्ता असून, १४ जण जखमी झाले आहेत.
हा अपघात शुक्रवारी कराचीच्या ॲडमिन सोसायटीमधील बलुच कॉलनीजवळ घडला. बांधकाम सुरू असलेली सहा मजली इमारत अचानक कोसळली आणि अनेक जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले. 'रेस्क्यू ११२२' सह आपत्कालीन बचाव पथकांनी घटनेनंतर तात्काळ बचावकार्य सुरू केले. अपघातानंतर सुमारे दोन दिवसांनी बचाव पथकाने एका संगमरवरी कारागिराला ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर काढले. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात जखमी झालेल्या १४ जणांपैकी १३ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे, तर एक जण रुग्णालयात दाखल आहे.
ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांपर्यंत पोहोचणे हे बचाव पथकांसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. अधिकारी अवजड यंत्रसामग्रीचा वापर टाळत असून, हाताने ढिगारा हटवताना काळजीपूर्वक काँक्रीटचे स्लॅब कापत आहेत.
अधिकाऱ्यांच्या मते, अवजड यंत्रसामग्रीच्या वापरामुळे उर्वरित रचना आणखी अस्थिर होऊ शकते आणि अडकलेल्यांना इजा होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. ज्या ठिकाणी लोक अडकल्याचा संशय आहे, त्या भागांपर्यंत पोहोचण्यासाठी बचाव पथकांनी ढिगाऱ्यातून मार्ग तयार केले आहेत. सर्व बेपत्ता व्यक्ती सापडेपर्यंत ही मोहीम सुरू राहील, असे बचाव अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
अपघातानंतर, इमारत कोसळल्याप्रकरणी पोलिसांनी खून, निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणा यासह अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणात १० जणांची नावे आहेत, त्यापैकी चौघांना अटक करण्यात आली आहे.
प्राथमिक तपासात बांधकाम कामादरम्यान सुरक्षा मानके आणि बांधकाम नियमांचे संभाव्य उल्लंघन झाल्याचे उघड झाले आहे. प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे.
या अपघातानंतर सिंध सरकारने मोठी प्रशासकीय कारवाई केली आहे. मुख्यमंत्री मुराद अली शाह यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत या घटनेचा आढावा घेण्यात आला.
या बैठकीनंतर, सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटीचे (एसबीसीए) महासंचालक वसीम शमशाद यांना त्यांच्या पदावरून हटवण्याचे आदेश देण्यात आले. त्यांना स्थानिक स्वराज्य संस्था सचिव पदावरूनही हटवण्यात आले. त्यांच्या जागी बिलाल मेमन यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर आबिद सलीम यांची एसबीसीएचे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय, पूर्व जिल्ह्याचे उपायुक्त नसरुल्ला अब्बासी, वरिष्ठ पोलीस अधीक्षक झुबेर शेख आणि एसबीसीएच्या इतर अधिकाऱ्यांना कथित निष्काळजीपणाबद्दल निलंबित करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी एसबीसीएच्या १६ संबंधित अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आणि अपघातास जबाबदार असलेल्यांची ओळख पटवण्याचे आदेशही दिले आहेत.
यापूर्वी फेब्रुवारीमध्ये कराचीमध्ये गॅस स्फोटामुळे एक इमारत कोसळून १६ जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षी जुलैमध्ये लयारी परिसरात पाच मजली इमारत कोसळून २७ जणांचा मृत्यू झाला होता. बचाव पथके सध्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेत असून, जबाबदार लोकांवर कारवाई केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे