‘राहुल गांधी पूर्णपणे हताश राजकीय नेते’- रविशंकर प्रसाद
भाजपने दिले राहुल गांधींच्या सर्व आरोपांना प्रत्युत्तर नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर (हिं.स.) : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परिसीमन विधेयकावरून केंद्र सरकारवर टीका केल्यानंतर भारतीय जनता पक्षाने (भाजप) शनिवारी त्यांच्यावर जोरदार निशाण
रविशंकर प्रसाद, भाजपचे ज्येष्ठ नेते


भाजपने दिले राहुल गांधींच्या सर्व आरोपांना प्रत्युत्तर

नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर (हिं.स.) : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परिसीमन विधेयकावरून केंद्र सरकारवर टीका केल्यानंतर भारतीय जनता पक्षाने (भाजप) शनिवारी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला. राहुल गांधी हे चुकीची माहिती पसरवत असून, देशातील लोकशाही संस्थांना कमकुवत करण्यासाठी बिनबुडाचे आरोप करत असल्याचा आरोप भाजपने केला.

भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधी यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. राहुल गांधी हे पूर्णपणे हताश झालेले राजकीय नेते असून, त्यांनी आपला राजकीय संयम गमावला आहे. त्यांच्या वक्तव्यांमधून अराजकता निर्माण करण्याची मानसिकता दिसून येते, असा आरोप त्यांनी केला.रविशंकर प्रसाद म्हणाले की, आज संध्याकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांच्या वक्तव्यांमधून एक पूर्णपणे हताश झालेला राजकीय नेता दिसून आला. त्यांनी आपला तोल गमावला असून, त्यांचे व्यक्तिमत्त्व पूर्णपणे अराजकतेकडे झुकले आहे. राहुल गांधी अराजकवादी आहेत आणि अराजकतेवर त्यांचा विश्वास आहे.यावेळी भाजप खासदारांनी राहुल गांधी यांच्यावर निवडणुकीतील कथित गैरप्रकार आणि संसदेच्या प्रस्तावित विस्ताराबाबत चुकीचे दावे केल्याचाही आरोप केला. राहुल गांधी यांनी खोटे बोलण्यात जणू 'सुपर डॉक्टरेट' मिळवली आहे, अशी उपरोधिक टीकाही प्रसाद यांनी केली.

परिसीमनाच्या मुद्द्यावर बोलताना रविशंकर प्रसाद म्हणाले की, काँग्रेसच्या सत्ताकाळात 3 वेळा परिसीमनाची प्रक्रिया पार पडली होती. त्यावेळी देशात हुकूमशाही आली होती का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हुकूमशाही तेव्हा आली होती, जेव्हा राहुल गांधी यांच्या आजी आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयातील खटल्यात पराभव झाल्यानंतर देशात आणीबाणी लागू केली होती, अशी आठवण त्यांनी करून दिली.निवडणूक आयोगावर राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवरही प्रसाद यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसशासित अनेक राज्य सरकारे याच निवडणूक प्रक्रियेद्वारे सत्तेत आली आहेत. मग त्याच प्रक्रियेवर वारंवार प्रश्न उपस्थित करण्याचे कारण काय, असा सवाल त्यांनी केला.

राहुल गांधी यांनी आज केलेल्या प्रत्येक आरोपाला आम्ही उत्तर देऊ. ते 2024 च्या लोकसभा निवडणुकीला 'बनावट' म्हणतात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'बनावट पंतप्रधान' संबोधतात. मात्र, राहुल गांधी स्वतः, त्यांच्या भगिनी आणि त्यांच्या पक्षाची अनेक राज्य सरकारे याच निवडणूक प्रक्रियेतून सत्तेत आली आहेत. मग त्यांनी राजीनामा का देऊ नये ? हा दुटप्पीपणा आणि ढोंगीपणा नाही तर दुसरे काय ? असे सवाल त्यांनी उपस्थितकेले.

दरम्यान, केंद्र सरकारवर राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना रविशंकर प्रसाद यांनी आणीबाणीच्या काळाचाही उल्लेख केला. राहुल गांधी यांनी भारतीय लोकशाहीची बदनामी करणे थांबवावे. भारतीय लोकशाहीची मुळे अत्यंत भक्कम आहेत. ही मुळे केवळ संविधानातच नव्हे, तर भारताच्या सभ्यता आणि संस्कृतीतही रुजलेली आहेत. आपल्या देशात विरोधकांच्या विचारांचाही सन्मान केला जातो, असे ते म्हणाले.

तसेच, तुमच्या डीएनएमध्ये आणीबाणीची मानसिकता आहे. त्या काळात विरोधी पक्षांच्या नेत्यांचा आवाज दाबण्यात आला होता, तर पत्रकार आणि संपादकांना तुरुंगात डांबण्यात आले होते, अशा शब्दांत रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande