कार्तिगई दीपम वादातील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे विहिंपकडून स्वागत
नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर (हिं.स.) - विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांनी तिरुपरनकुंद्रम दीपम वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या महत्त्वपूर्ण आदेशाचे स्वागत केले. त्यांनी म्हटले की, हा तामिळनाडू सरकारला आणि
आलोक कुमार


नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर (हिं.स.) - विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांनी तिरुपरनकुंद्रम दीपम वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या महत्त्वपूर्ण आदेशाचे स्वागत केले. त्यांनी म्हटले की, हा तामिळनाडू सरकारला आणि हिंदू श्रद्धेच्या विरोधात सक्रियपणे काम करणाऱ्या राजकारणाला मिळालेली चपराक आहे. न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा, कायद्याचे राज्य आणि कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक श्रद्धेचे जतन करण्याच्या दिशेने हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे.

त्यांनी सांगितले की, २० नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने 'दीपथून' (दीपस्तंभ) वर 'कार्तिगई दीपम' प्रज्वलित करण्याचे स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही, २४ नोव्हेंबर रोजी तो दिवा लावण्यात आला नाही. काही हिंदूविरोधी राजकीय पक्ष आणि प्रशासकीय यंत्रणेने ज्या धिटाईने न्यायालयाचा आदेश निष्प्रभ करण्याचा प्रयत्न केला, ते लोकशाही व्यवस्था आणि न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेला दिलेले आव्हान होते.

सर्वोच्च न्यायालयाने २८ नोव्हेंबर रोजी 'दीपथून'वर दिवा प्रज्वलित करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. न्यायालयाने मंदिराच्या विश्वस्त मंडळाला (बोर्ड ऑफ ट्रस्टीज) निलंबित केले असून, मद्रास उच्च न्यायालयाचे दोन माजी न्यायाधीश न्यायमूर्ती एस. वैद्यनाथन आणि न्यायमूर्ती व्ही. पार्थिवन यांची 'रिसीव्हर' (प्रशासक) म्हणून नियुक्ती केली आहे. मंदिर आणि दर्गा या दोन्ही ठिकाणांच्या सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफकडे सोपवण्यात आली असून, भाविकांना दर्ग्यापासून किमान ५० मीटर अंतरावर दिवा लावण्याची परवानगी देण्यात आली आहे.

न्यायालयाने तामिळनाडूचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, मदुराईचे जिल्हाधिकारी आणि मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी 'कारणे दाखवा' नोटीस बजावली आहे. २० नोव्हेंबरच्या आदेशाचे जाणीवपूर्वक उल्लंघन केल्याचे प्राथमिक दर्शनी दिसून येत असल्याबद्दल आणि मदुराईमधील प्रशासकीय अराजकतेबद्दल न्यायालयाने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर, संबंधित अधिकाऱ्यांमधील पत्रव्यवहार, ई-मेल आणि इतर संवादांचा तपशीलही न्यायालयाने मागवला आहे.

आलोक कुमार म्हणाले की, कोणतेही सरकार, राजकीय पक्ष किंवा प्रशासकीय अधिकारी न्यायव्यवस्थेच्या वर असू शकत नाही. त्यांनी सांगितले की, आता तरी किमान तामिळनाडूमध्ये हिंदू श्रद्धा आणि धार्मिक समजुतींचा आदर राखला जाईल, तसेच कायद्याचे राज्य पुन्हा प्रस्थापित होईल, अशी अपेक्षा आहे. राज्य सरकार आपल्या मागील चुकांतून धडा घेऊन, भविष्यात न्यायालयाचे आदेश आणि हिंदू धार्मिक परंपरांचे उल्लंघन करण्याचे असे धाडस पुन्हा होणार नाही, याची खात्री करेल.

त्यांनी हेही स्पष्ट केले की, न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दाखल याचिकेवर पुढील सुनावणी अजून बाकी आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांना १५ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत; त्यामुळे आता अंतिम न्यायालयीन निर्णयाची प्रतीक्षा असेल. असे असले तरी, सर्वोच्च न्यायालयाने आज ज्या ठामपणे हस्तक्षेप केला आहे, तो न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा, कायद्याचे राज्य आणि हिंदू श्रद्धा पुन्हा प्रस्थापित करण्याच्या दिशेने उचललेले एक स्वागतार्ह पाऊल आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande