
तमिळनाडूच्या संसदीय प्रतिनिधित्वाचे संरक्षण झाल्याचा डीएमकेचा दावा
खासदारांच्या बैठकीत विधेयकाच्या समर्थनार्थ ठराव मंजूर
नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर (हिं.स.) : केंद्र सरकारच्या प्रस्तावित मतदारसंघ फेररचना विधेयकाला तमिळनाडूतील द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) पक्षाने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे अध्यक्ष आणि तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या अध्यक्षतेखाली चेन्नई येथे झालेल्या खासदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने मांडलेल्या नव्या प्रस्तावात तमिळनाडूच्या संसदीय प्रतिनिधित्वासंदर्भातील प्रमुख मागण्या मान्य झाल्याचा दावा डीएमकेने केला आहे.
केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन 30 नोव्हेंबरपासून बोलावले असून, या अधिवेशनात मतदारसंघ फेररचना आणि महिला आरक्षणाशी संबंधित विधेयकांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. लोकसभेत ३० नोव्हेंबरला, तर राज्यसभेत २ डिसेंबरला कामकाज होणार आहे. या पार्श्वभूमीवर डीएमकेने घेतलेल्या भूमिकेला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
खासदारांच्या बैठकीत पाठिंब्याचा ठराव
चेन्नईतील अण्णा अरिवालयम येथे स्टॅलिन यांच्या अध्यक्षतेखाली डीएमकेच्या लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत केंद्र सरकारच्या नव्या मतदारसंघ फेररचना प्रस्तावाला पाठिंबा देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार ए. राजा यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना या निर्णयाची माहिती दिली. डीएमकेने सर्व राज्यांमध्ये लोकसभेच्या जागांमध्ये 50 टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा देण्याचे निश्चित केले आहे. मात्र, या प्रक्रियेत तमिळनाडूसह दक्षिणेकडील राज्यांच्या संसदीय प्रतिनिधित्वावर प्रतिकूल परिणाम होऊ नये, अशी पक्षाची भूमिका आहे.
तमिळनाडूच्या 7.18 टक्के प्रतिनिधित्वाचा मुद्दा
डीएमकेने मतदारसंघ फेररचनेच्या संदर्भात दोन प्रमुख मागण्या केंद्र सरकारसमोर मांडल्या होत्या. लोकसभेतील तमिळनाडूचा सध्याचा 7.18 टक्के जागांचा वाटा कमी होऊ नये आणि 1971 च्या जनगणनेच्या आधारे निश्चित करण्यात आलेले राज्यांमधील संसदीय प्रतिनिधित्वाचे प्रमाण पुढील 25 वर्षांसाठी कायम ठेवावे, या त्या मागण्या आहेत.नव्या प्रस्तावात या मागण्यांचा समावेश झाल्यामुळे पक्षाने विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे स्टॅलिन यांनी स्पष्ट केले. डीएमकेच्या दाव्यानुसार, नव्या व्यवस्थेमुळे तमिळनाडूच्या लोकसभा जागांची संख्या 39 वरून 51 होणार असून, प्रतिनिधित्वाचा वाटा 7.18 टक्क्यांवरून 7.21 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
प्रक्रियात्मक मुद्द्यांवर दुरुस्तीची शक्यता
बैठकीनंतर खासदार ए. राजा यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, आम्ही काँग्रेससोबत असलो किंवा नसलो, सत्तेत असलो किंवा नसलो, तरी लोकसभेतील तमिळनाडूच्या 7.18 टक्के जागांचा वाटा कायम राहावा, ही आमची सातत्यपूर्ण मागणी राहिली आहे. आता नव्या प्रस्तावात आमची मागणी मान्य झाल्याचे दिसत आहे. मात्र, काही प्रक्रियात्मक प्रश्न आहेत. त्यांचा आम्ही अभ्यास करू. आवश्यकता भासल्यास संसदेत दुरुस्त्याही सुचवू.मतदारसंघ फेररचना आयोगाच्या कार्यपद्धतीसह काही तरतुदींवर पक्षाला अद्याप आक्षेप आणि शंका असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे विधेयकाला पाठिंबा देतानाच आवश्यक त्या दुरुस्त्या मांडण्याची भूमिका डीएमकेने घेतली आहे.
स्टॅलिन यांनी विरोधकांवर साधला निशाणा
दरम्यान, शुक्रवारी 27 नोव्हेंबर रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत स्टॅलिन यांनी मतदारसंघ फेररचनेबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली होती. तमिळनाडूच्या संसदीय प्रतिनिधित्वात कोणतीही घट होऊ देणार नाही आणि राज्यांमधील जागांचे विद्यमान प्रमाण पुढील २५ वर्षे कायम ठेवण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी म्हटले होते.मतदारसंघ फेररचनेमुळे दक्षिणेकडील राज्यांच्या प्रतिनिधित्वावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन डीएमकेने सर्वप्रथम हा मुद्दा राष्ट्रीय स्तरावर उपस्थित केल्याचा दावाही त्यांनी केला होता. या विषयावर विविध राज्यांच्या नेत्यांची बैठक चेन्नई येथे आयोजित करण्यात आल्याची आठवणही त्यांनी करून दिली होती.आता केंद्र सरकारच्या नव्या प्रस्तावात पक्षाच्या प्रमुख मागण्यांचा समावेश झाल्याचे सांगत स्टॅलिन यांनी या निर्णयाला तमिळनाडूच्या हिताचे संरक्षण करणारे पाऊल म्हटले आहे. त्यामुळे संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनात डीएमकेची भूमिका काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
--------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी