
दिल्ली पोलिसांच्या नावाने तोतया पोलिसांचा प्रताप
अटकेची भीती दाखवून वेगवेगळ्या बँक खात्यांत पैसे केले ट्रान्स्फर
नाशिक, २८ नोव्हेंबर (हिं.स.) : मनी लॉण्डरिंगच्या प्रकरणात सहभागी असल्याचे सांगत अटकेची धमकी देऊन तोतया पोलिसांनी एका व्यक्तीला तब्बल १८ लाख रुपयांचा ऑनलाइन गंडा घातल्याची घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. दिल्ली पोलीस असल्याचे भासवून व्हॉट्सॲप कॉलद्वारे संपर्क साधत सायबर भामट्यांनी ही फसवणूक केली. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.
याबाबत सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घरी असताना अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर व्हॉइस कॉल आणि व्हिडिओ कॉल केला. यावेळी फोनवर बोलणाऱ्या तसेच चॅटिंग करणाऱ्या व्यक्तींनी आपण दिल्ली पोलीस कार्यालयातून बोलत असल्याचे भासविले.
त्यानंतर फिर्यादी यांना मनी लॉण्डरिंगच्या प्रकरणात त्यांचा सहभाग आढळून आल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात त्यांना अटक करावी लागेल, अशी धमकी देत आरोपींनी त्यांच्यावर मानसिक दबाव निर्माण केला. तसेच प्रकरणाच्या तपासाचे कारण पुढे करून अटकेपासून वाचण्यासाठी पैशांची आवश्यकता असल्याचे भासविले.
आरोपींच्या धमक्यांना बळी पडलेल्या फिर्यादी यांनी त्यांच्या सांगण्यावरून वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण १८ लाख रुपये ऑनलाइन ट्रान्स्फर केले. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली.
हा फसवणुकीचा प्रकार ७ ते २६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत मोबाईल फोन आणि इंटरनेटच्या माध्यमातून घडला. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात तोतया पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोल्हे करीत आहेत. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यासह आर्थिक व्यवहारांची माहिती तपासली जात आहे.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI