बांगलादेशचा मुशफिकुर रहीम फेब्रुवारी २०२७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार
ढाका (बांगलादेश), 28 नोव्हेंबर (हिं.स.)बांगलादेशचा अनुभवी फलंदाज आणि कसोटी संघाचा माजी कर्णधार मुशफिकुर रहीम याने फेब्रुवारी २०२७ मध्ये मायदेशात इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या ''आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप'' मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृ
मुशफिकुर रहीम


ढाका (बांगलादेश), 28 नोव्हेंबर (हिं.स.)बांगलादेशचा अनुभवी फलंदाज आणि कसोटी संघाचा माजी कर्णधार मुशफिकुर रहीम याने फेब्रुवारी २०२७ मध्ये मायदेशात इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या 'आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप' मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने अधिकृतपणे बांगलादेश क्रिकेट बोर्डाला या निर्णयाची माहिती दिली आहे.

मुशफिकुरच्या या निर्णयामुळे त्याच्या २१ वर्षांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा समारोप होईल. बांगलादेशचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक म्हणून त्याने आपली ओळख निर्माण केली आहे.

मुशफिकुरच्या या निर्णयाची घोषणा करताना बीसीबीचे अध्यक्ष तमीम इक्बाल म्हणाले, मुशफिकुरने मला वैयक्तिकरित्या विनंती केली आहे की, फेब्रुवारी २०२७ मध्ये ढाका येथे इंग्लंडविरुद्ध होणारा कसोटी सामना हा त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना असेल. माझ्यासाठी हा अत्यंत भावूक क्षण आहे. आम्ही जवळजवळ एकत्रच मोठे झालो आहोत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या प्रवासात आम्ही अनेक अनुभव एकत्र शेअर केले आहेत.

तमीम इक्बाल पुढे म्हणाले, त्याने मैदानावर आणि मैदानाबाहेरही बांगलादेश क्रिकेटसाठी खूप काही दिले आहे. त्याचे योगदान दीर्घकाळ लक्षात ठेवले जाईल. त्याने एक अमूल्य वारसा निर्माण केला आहे आणि त्याच्या निर्णयाचा मी पूर्ण आदर करतो. मी त्याला आणि त्याच्या कुटुंबाला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो.

मुशफिकुर रहीमने २००५ मध्ये लॉर्ड्सच्या मैदानावरून आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. आतापर्यंत खेळलेल्या १०८ कसोटी सामन्यांत त्याने ३८.८० च्या सरासरीने ७०६२ धावा केल्या आहेत.गेल्या काही वर्षांत, बांगलादेशच्या अनेक ऐतिहासिक कसोटी विजयांमध्ये तो महत्त्वाचा खेळाडू राहिला आहे. यात ऑगस्ट महिन्यात डार्विन येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळवलेल्या नऊ गडी राखून विजयाचाही समावेश आहे. मात्र, अलीकडच्या काळात त्याच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून आला आहे. मे महिन्यात सिल्हेट येथे पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावल्यानंतर, त्यानंतरच्या ११ डावांत तो केवळ एकदाच अर्धशतकाचा टप्पा ओलांडू शकला आहे.

दोन दशकांहून अधिक काळ राष्ट्रीय संघाचा मुख्य आधारस्तंभ राहिलेला मुशफिकुर, बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनेक अविस्मरणीय क्षणांचा केंद्रबिंदू राहिला आहे. बांगलादेशच्या क्रिकेट इतिहासात त्यांचे एक विशेष स्थान आहे. तो १०० कसोटी सामने खेळणारा पहिला बांगलादेशी क्रिकेटपटू आहे. आणि या प्रकारात ७,००० धावांचा टप्पा गाठणाराही तो पहिलाच बांग्लादेशचा क्रिकेटपटू आहे. कसोटी क्रिकेटमध्ये बांगलादेशी फलंदाजाद्वारे नोंदवलेली ही सर्वाधिक धावसंख्या आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande