
नवी दिल्ली, २८ नोव्हेंबर (हिं.स.)बहुप्रतिक्षित हॉकी इंडियाच्या निवडणुका आता ५ डिसेंबर रोजी होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी ओडिशा उच्च न्यायालयाचे ६ आणि १८ नोव्हेंबरचे दोन्ही आदेश रद्द करून निवडणूक प्रक्रियेवरील स्थगिती उठवली. यामुळे देशातील हॉकीचे नियमन करणाऱ्या संस्थेच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन आणि अरुण पल्ली यांच्या खंडपीठाने हॉकी इंडियाने ओडिशा हॉकी असोसिएशनला बजावलेल्या दोन्ही कारणे दाखवा नोटिसाही मागे घेतल्या, ज्यात ओडिशास्थित संस्थेला स्थायी सदस्यत्वावरून सहयोगी सदस्यत्वावर श्रेणीसुधारित करण्याचा प्रस्ताव होता. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, खेळाडूंच्या हिताला कोणत्याही प्रकारे धक्का पोहोचू दिला जाऊ शकत नाही. खेळाडू मैदानावर कठोर परिश्रम घेत आहेत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे, निवडणुकीच्या वादामुळे त्यांचे भविष्य आणि देशाचे हित धोक्यात आणले जाऊ शकत नाही.
सर्वोच्च न्यायालयाने ओडिशा हॉकी असोसिएशनच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती ए. के. सिक्री यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. खंडपीठाने म्हटले आहे की, ओडिशा असोसिएशनने ओरिसा उच्च न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिका निकाली काढल्या जातील. तथापि, काही तक्रारी किंवा आक्षेप शिल्लक राहिल्यास, समिती त्यांचे निराकरण करेल. सुनावणीदरम्यान, न्यायालयाने हॉकी इंडियाचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांना स्पष्ट केले की, कारणे दाखवा नोटीस मागे घेतली पाहिजे आणि खटल्यांमुळे निवडणुकीत हस्तक्षेप होऊ दिला जाणार नाही.
हॉकी इंडियाचे प्रतिनिधित्व करणारे मुकुल रोहतगी यांनी न्यायालयाला सांगितले की, नियोजित तारखेला निवडणुका न झाल्यास आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघासोबतच्या संघटनेच्या संलग्नतेवर परिणाम होऊ शकतो. खंडपीठाने नमूद केले की, हॉकी हा देशाचा राष्ट्रीय खेळ असून त्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा समावेश आहे. निवडणूक प्रक्रियेत व्यत्यय आणणारी किंवा खेळाडूंच्या हितावर परिणाम करणारी कोणतीही परिस्थिती न्यायालय खपवून घेणार नाही. खंडपीठाने पुढे म्हटले की, निवडणुका वेळेवर घेणे आवश्यक आहे, कारण कोणत्याही विलंबाचा देशाच्या आंतरराष्ट्रीय सहभागावर आणि हॉकीमधील हितावर परिणाम होऊ शकतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे