
कोल्हापूर, 03 नोव्हेंबर, (हिं.स.)। ऊसाला पहिली उचल 4500 मिळावी या मुख्य मागणीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने माजी खा., शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली किणी टोलनाका येथे पुणे-बंगळुरू बेमुदत महामार्ग रोको आंदोलन सुरु केले. सकाळी 11 वाजल्यापासून आंदोलनासाठी मोठ्या संख्येने शेतकरी टोल नाक्यावर दाखल झाले. ऊस दराचा ठोस निर्णय झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा ठाम निर्धार करून सुरु केलेल्या आंदोलनामुळे महामार्गवरील वाहतूक ठप्प झाली. वाहनधारकांची कुचंबना झाली. याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आणि काही वाहनांसाठी पर्यायी मार्गांचा वापर केला. दिवसभर आणि रात्री उशिरा पर्यंत आंदोलन सुरु राहिले. यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.
शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांमधील उसदराची कोंडी अद्याप फुटलेली नाही. नुकतीच पालकमंत्री आणि कारखानदारांसोबत झालेली बैठक निष्फळ ठरल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपला पवित्राआक्रमक करीत ४,५०० पहिली उचल ठरत नाही तोपर्यंत उसाचं कांडकं तोडू देणार नाही असा इशारा दिला.
साखर प्रतिक्विंटल ४,७०० ते ५००० रुपये दराने विकली जात आहे. मग उसाला पहिली उचल का जाहीर केली जात नाही असा सवाल केला आहे.
मागील आठवड्यात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी संघटना व कारखानदार यांच्यात झालेली बैठक निष्फळ झाली. साखर कारखानदारांनी 3800 रु देण्याची तयारी दर्शवली आहे पण शेतकरी संघटना पहिली किमान 4500 रु. द्यावी या मागणीवर ठाम आहे.
सकाळी आंदोलन सुरु झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी किणी परिसरातील ग्रामस्थांनी दुपारच्या भोजनाची व्यवस्था केली. विशेषत: महिलांनी भाकऱ्यांच्या टोपल्या भरून आंदोलनस्थळी राजू यांच्याकडे सुपूर्द केल्या. तसेच ग्रामस्थांनी स्वयंसेवकांची भूमिका बजावत झुणका,भाकरी,भात आमटी असे जेवण, पाणी, द्रोण, पत्रावळ्या आणून जेवण वाढण्याचेही काम केले. सर्वांनी थेट रस्त्यावर बसून जेवण केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar