नामको हॉस्पिटलमध्ये मोफत कर्करोग तपासणी अभियानाचा शुभारंभ
मंत्री नरहरी झिरवळ यांच्या हस्ते उद्घाटन; मंत्री भुजबळ यांचा व्हिडिओ संदेशातून पाठिंबा नाशिक, 03 नोव्हेंबर (हिं.स.)। : कर्करोगाचे वेळेत निदान व्हावे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाही आधुनिक तपासणी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने हिमांशू
नामको हॉस्पिटलमध्ये मोफत कर्करोग तपासणी अभियानाचा शुभारंभ


मंत्री नरहरी झिरवळ यांच्या हस्ते उद्घाटन; मंत्री भुजबळ यांचा व्हिडिओ संदेशातून पाठिंबा

नाशिक, 03 नोव्हेंबर (हिं.स.)।

: कर्करोगाचे वेळेत निदान व्हावे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाही आधुनिक तपासणी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने हिमांशू रॉय फाउंडेशनने महाराष्ट्र कर्करोग तपासणी अभियान सुरू केले आहे. पंचवटीतील नामको हॉस्पिटल व टीझर लॅब्सच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे उद्घाटन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या हस्ते करण्यात आले. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विशेष व्हिडिओ संदेशाद्वारे या उपक्रमाला पाठिंबा दिला.

नामको हॉस्पिटल येथे आयोजित कार्यक्रमात या अभियानाची अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, भुजबळ नॉलेज सिटीच्या संचालिका डाॅ. शेफाली भुजबळ , नामको चॅरीटेबलचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी, सुप्रसिद्ध लेखक तथा हिमांशू रॉय फाउंडेशनचे सहसंस्थापक अमीश त्रिपाठी, फाउंडेशनच्या संस्थापक-संचालिका भावना रॉय, नामको हॉस्पिटलचे सचिव शशीकांत पारख , जनरल मॅनेजर समीर तुळजापुरकर आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. शेफाली भुजबळ यांनी सांिगतले की, आरोग्य हीच खरी संपत्ती असून, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मोफत आणि आधुनिक तपासणी सुविधा पोहोचणे आवश्यक आहे. या अभियानांतर्गत हिमांशू रॉय कॅन्सर स्क्रीनिंग अँड अवेअरनेस टेस्ट या उपक्रमातून महाराष्ट्रातील २० हजार नागरिकांची मोफत कर्करोग तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

यावेळी मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, “हिमांशू रॉय यांच्या नावाने भावना रॉय पुढे नेत असलेले सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी भागांत कर्करोगाविषयी जनजागृती व वेळेवर निदान होणे गरजेचे आहे. अनेकदा आर्थिक अडचणींमुळे रुग्ण तपासणी आणि उपचारांकडे दुर्लक्ष करतात. नामको हॉस्पिटलची तळागाळातील लोकांपर्यंत पोहोच असल्याने या भागीदारीचा मोठा फायदा होईल. या उपक्रमाला माझे पूर्ण सहकार्य राहील.

विशेष व्हिडिओ संदेशात मंत्री छगन भुजबळ म्हणाले, “हिमांशू रॉय हे लोकप्रिय पोलीस अधिकारी होते. त्यांनी स्वतः कर्करोगाशी धैर्याने लढा दिला. त्यांच्या स्मृतीचा सन्मान करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांच्या नावाने सामाजिक कार्य करणे हा आहे. ” हिमांशू रॉय फाउंडेशनच्या संस्थापक-संचालिका आणि लेखिका भावना रॉय म्हणाल्या की, “वारसा म्हणजे केवळ आठवणी जपणे नव्हे, तर त्या व्यक्तीने जपलेली मूल्ये आणि सामाजिक बांधिलकी पुढे नेणे होय.” फाउंडेशनचे सह-संस्थापक आणि प्रसिद्ध लेखक अमीश त्रिपाठी म्हणाले, “एखाद्या व्यक्तीचा वारसा त्याच्या कार्यामुळे किती लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडतो, यातून जपला जातो. आर्थिक परिस्थितीमुळे कोणालाही आवश्यक आरोग्यसेवेपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी नामको हॉस्पिटलसोबतची ही भागीदारी महत्त्वाचे पाऊल आहे. यावेळी नामको हॉस्पिटलचे पदाधिकारी, नागरीक उपस्थित होते.

: समाजसेवेचा वारसा जपण्याचा संकल्प

दिवंगत हिमांशू रॉय, आयपीएस यांच्या समाजसेवेचा आणि सामाजिक बांधिलकीचा वारसा पुढे नेण्यासाठी हिमांशू रॉय फाउंडेशनने हा उपक्रम हाती घेतला आहे. महाराष्ट्रासह देशभरात मोफत कर्करोग तपासणी, जनजागृती आणि वेळेवर निदानाच्या माध्यमातून गरजू नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याचा फाउंडेशनचा प्रयत्न आहे. हे अभियान गोरगरीब व गरजू रुग्णांसाठी मदतगार ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande