
जळगाव, 03 नोव्हेंबर (हिं.स.) | दिवाळी मुहूर्तावर सोने-चांदी खरेदीचे नियोजन करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. जळगावच्या सराफ बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम १ हजार ५०० रुपयांची, तर चांदीच्या दरात प्रति किलो ५ हजार रुपयांची घट नोंदवण्यात आली आहे. दिवाळीपूर्वी दर कमी झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात वाढ झाली होती. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी सराफ बाजारात जाणाऱ्या ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. मात्र, आज अचानक दरात घसरण झाल्याने खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे.जळगावच्या सराफ बाजारात आज मंगळवारी सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम १ हजार ५०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे जीएसटीसह सोन्याचा दर १ लाख ४२ हजार ६५५ रुपयांवर आला आहे. मागील काही दिवसांतील दरातील चढ-उतार पाहता दिवाळीपूर्वी झालेली ही घसरण ग्राहकांसाठी महत्त्वाची मानली जात आहे.
सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. एक किलो चांदीच्या दरात ५ हजार रुपयांची घट झाली असून आजचा दर १ लाख ८६ हजार ४३० रुपयांवर आला आहे. त्यामुळे चांदीची खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांनाही दिलासा मिळाला आहे. दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या पार्श्वभूमीवर सराफ बाजारात खरेदीला वेग येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सोन्या-चांदीच्या दरात झालेली घसरण ग्राहकांसाठी दिलासादायक ठरत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर