शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स १,२२५ अंकांनी वधारला
एका दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ३.९९ लाख कोटींची भर नवी दिल्ली, 03 नोव्हेंबर (हिं.स.)। भारतीय शेअर बाजारात तेजीचे वादळ कायम असून, सलग चौथ्या व्यवहाराच्या दिवशी बाजाराने जोरदार मुसंडी मारली. ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातील समभागांमध्ये झालेली
Stock Market Closing


एका दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ३.९९ लाख कोटींची भर

नवी दिल्ली, 03 नोव्हेंबर (हिं.स.)। भारतीय शेअर बाजारात तेजीचे वादळ कायम असून, सलग चौथ्या व्यवहाराच्या दिवशी बाजाराने जोरदार मुसंडी मारली. ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातील समभागांमध्ये झालेली प्रचंड खरेदी आणि विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांना दीर्घकालीन भांडवली नफा करात सवलत देण्याच्या प्रस्तावामुळे बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या तेजीच्या जोरावर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १ हजार २२५ अंकांनी उसळला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २३,८०० अंकांच्या पुढे पोहोचला. बाजारातील चौफेर खरेदीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एकाच दिवसात तब्बल ३.९९ लाख कोटी रुपयांची वाढ झाली.

मंगळवारी व्यवहाराच्या सुरुवातीपासूनच बाजारात तेजीचे वातावरण होते. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५९५.८७ अंकांच्या वाढीसह ७६,२८८.६५ अंकांवर खुला झाला. सुरुवातीपासूनच मोठ्या कंपन्यांच्या समभागांमध्ये खरेदीचा जोर दिसून आला. मात्र, काही काळ नफावसुली झाल्याने सेन्सेक्स ७६,0३३.७४ अंकांपर्यंत घसरला होता. त्यानंतर ग्राहकोपयोगी वस्तू आणि खासगी बँकिंग क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांच्या समभागांमध्ये जोरदार खरेदी सुरू झाली. विशेषतः व्यवहाराच्या शेवटच्या टप्प्यात खरेदीचा वेग वाढल्याने सेन्सेक्सने १,२२५.०७ अंकांची म्हणजेच १.६२ टक्क्यांची झेप घेत ७६,९१७.८५ अंकांवर दिवसाचा उच्चांक गाठत व्यवहाराची समाप्ती केली.

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीदेखील १४१.४५ अंकांच्या वाढीसह २३,५८२.२५ अंकांवर खुला झाला. सुरुवातीच्या व्यवहारात झालेल्या खरेदीमुळे निर्देशांकाने तेजी कायम ठेवली. काही काळ नफावसुलीमुळे निफ्टी २३,४८२.८० अंकांपर्यंत घसरला होता. मात्र, त्यानंतर खरेदीदार पुन्हा सक्रिय झाल्याने निर्देशांकाने जोरदार पुनरागमन केले. सात सप्टेंबरनंतर प्रथमच निफ्टीने २३,८०० अंकांची पातळी ओलांडली. अखेर ३७०.०५ अंकांची म्हणजेच १.५८ टक्क्यांची वाढ नोंदवत तो २३,८१०.८५ अंकांवर बंद झाला.

क्षेत्रनिहाय व्यवहारात ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्राने सर्वाधिक चमक दाखवली. निफ्टीचा हा निर्देशांक ३.६५ टक्क्यांनी वधारला. विशेष म्हणजे या क्षेत्रातील सर्व १५ समभाग तेजीत बंद झाले. खासगी बँकिंग निर्देशांकात सुमारे दोन टक्क्यांची वाढ झाली. स्थावर मालमत्ता क्षेत्राचा निर्देशांक दोन टक्क्यांहून अधिक, तर वाहन क्षेत्राचा निर्देशांक १.७१ टक्क्यांनी वधारला. मात्र, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या समभागांमध्ये विक्री झाल्याने हा निर्देशांक १.२७ टक्क्यांनी घसरला.

मध्यम आणि लघु कंपन्यांच्या समभागांमध्येही खरेदीचा उत्साह दिसून आला. निफ्टी मिडकॅप १०० निर्देशांक १.०६ टक्क्यांनी, तर स्मॉलकॅप १०० निर्देशांक ०.३१ टक्क्यांनी वधारला. मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य वाढून ४८६.७४ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. सोमवारी ते ४८२.७४ लाख कोटी रुपये होते. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ३ लाख ९९ हजार ६५४ कोटी रुपयांची भर पडली.

समभागांच्या कामगिरीत बीएसई लिमिटेडने ५.०३ टक्क्यांची वाढ नोंदवत आघाडी घेतली. नेस्ले ४.४७ टक्के, टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स ४.२९ टक्के, एशियन पेंट्स ३.९९ टक्के आणि भारती एअरटेल ३.७७ टक्क्यांनी वधारले. दुसरीकडे पॉवर ग्रिडचा समभाग ३.०४ टक्क्यांनी घसरला. भारतीय स्टेट बँक, ओएनजीसी, इन्फोसिस आणि अदानी एंटरप्रायझेसच्या समभागांमध्येही घसरण नोंदवण्यात आली. एकूणच सलग चौथ्या दिवशी बाजारात तेजी कायम राहिल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande