
नाशिक, 03 नोव्हेंबर (हिं.स.)। मीनाताई ठाकरे स्टेडियम, पंचवटी येथे नुकत्याच पार पडलेल्या नाशिक विभागीय आंतरशालेय ॲथलेटिक्स स्पर्धेत अशोका स्कूलच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
मुलींच्या १७ वर्षांखालील गटात जान्हवी पाटोळे हिने तीन क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक साधली. तिने १०० मीटर धावणे, १०० मीटर अडथळा शर्यत (हर्डल्स) आणि लांब उडी या तिन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक मिळवत तीन सुवर्णपदकांवर आपले नाव कोरले. याच गटात ईश्वरी खैरे हिने १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्यपदक, तर तिहेरी उडीमध्ये सुवर्णपदक पटकावून अशोका स्कूलच्या यशात मोलाची भर घातली.
या दोन्ही खेळाडूंची पालघर येथे ३ ते ५ नोव्हेंबर २०२६ दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामुळे आता या दोन्ही खेळाडू राज्यस्तरावर नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या खेळाडूंना अशोका स्कूलच्या उपप्राचार्य डॉ. प्रिया डिसूझा, उपप्राचार्य प्रमोद त्रिपाठी, ॲथलेटिक्स प्रशिक्षक बालाजी शिरफुले, क्रीडा विभाग प्रमुख भूपेश देशमुख आणि अशोका स्कूलचे सहाय्यक महाव्यवस्थापक (AGM) डॉ. दिनेश सबनीस यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. तसेच पालकांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
दोन्ही खेळाडूंच्या या उल्लेखनीय यशाबद्दल अशोका स्कूल व्यवस्थापन, शिक्षकवृंद, क्रीडा विभाग आणि पालकांनी त्यांचे अभिनंदन केले आणि आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI