
लातूर, 03 नोव्हेंबर, (हिं.स.)। महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर येथील खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले असून, महाविद्यालयाच्या कु. वैष्णवी राठोड, कु. साक्षी कोरे आणि गजानन जाधव या तीन खेळाडूंची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या क्रॉस कंट्री संघात निवड झाली आहे. या खेळाडूंनी विद्यापीठाच्या संघात स्थान मिळविल्यामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
दिनांक 6 ते 7 नोव्हेंबर 2026 या कालावधीत मंगळूर विद्यापीठ, मंगळागंगोथ्री यांच्या अंतर्गत गव्हर्नमेंट फर्स्ट ग्रेड कॉलेज, क्रोडाश्रमा, उडुपी (कर्नाटक) येथे अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रॉस कंट्री (10 कि.मी. धावणे) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा संघ नांदेड येथून स्पर्धास्थळाकडे रवाना झाला आहे. या संघामध्ये महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या वरील तीन खेळाडूंचा समावेश असून, ते विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis