
एज्युस्पार्क कंपनीला 2300 कोटींची कामे दिल्याचा दावा
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी
मुंबई,03 नोव्हेंबर (हिं.स.) : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील प्रवेश प्रक्रियेत तसेच सीईटी परीक्षेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. सीईओपी महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेतील कथित घोटाळ्यामुळे मागील काही वर्षांत महाविद्यालयाची रँकिंग घसरल्याचा दावाही त्यांनी केला.
सीईटी परीक्षेतील डेटा लीक प्रकरणात एज्युस्पार्क कंपनीचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करत या कंपनीला राज्यात तब्बल २३०० कोटी रुपयांची कामे देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारने विशेष तपास पथकाची (एसआयटी) नियुक्ती केली असली, तरी प्रत्यक्षात तपासात पुढे काहीच हालचाल दिसत नसल्याचे रोहित पवार यांनी म्हटले. या प्रकरणात संबंधित कंपनीला कोणाच्या आशीर्वादाने आणि कोणत्या निकषांवर कामे देण्यात आली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.रोहित पवार यांनी यावेळी कथित गैरप्रकार उघड करण्यासाठी करण्यात आलेले स्टिंग ऑपरेशन सादर केले.
या स्टिंगमध्ये काही शिक्षकांनी सीईटी परीक्षेतील कथित गैरव्यवहाराची पद्धत आणि प्रवेशासाठी पैशांची मागणी कशी केली जाते, याबाबत माहिती दिल्याचा दावा करण्यात आला. शिक्षक नारायण शिंगारे यांनी टॉप इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी 25 लाख रुपयांपर्यंत रक्कम मागितली जात असल्याचे सांगितले. सीईटी परीक्षेत चांगले गुण आणि नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्यासाठी पैशांचा दर सांगितल्याचा त्यांचा आरोप आहे. शिंगारे यांच्या म्हणण्यानुसार, सुभेंदू प्रभात नावाच्या व्यक्तीच्या सात कंपन्या असून, लखनौ येथून कंपनीचे कामकाज चालवले जाते. संबंधित व्यक्तीने एका मंत्र्याचा भाऊ असल्याचे सांगितल्याचाही दावा त्यांनी केला.
एज्युस्पार्क कंपनीला पहिल्यांदा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या कार्यकाळात काम देण्यात आल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. त्यानंतर चंद्रकांत पाटील, दीपक केसरकर आणि पुन्हा चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकाळातही याच कंपनीला कामे देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कंपनीला चुकीच्या पद्धतीने कंत्राटे देण्यात आल्याचा आरोप करत २३०० कोटी रुपयांच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा दावाही त्यांनी केला.दरम्यान, शिंगारे यांनी स्थानिक पोलीस ठाणे आणि एसआयटीकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला; मात्र गुन्हा दाखल करून घेण्यात आला नसल्याचा आरोप केला. शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरप्रकार थांबवण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.सीईटीसारख्या महत्त्वाच्या प्रवेश परीक्षेतील पारदर्शकतेवर या आरोपांमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
-------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी