ईडीची केरळ आणि तामिळनाडूमध्ये ११ ठिकाणी छापेमारी
सहकारी संस्थेच्या निधीच्या अपहाराचे आरोप‘आप’ आमदाराच्या निवासस्थानीही झाडाझडती नवी दिल्ली, 04 नोव्हेंबर (हिं.स.) : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी केरळ, पंजाब आणि तामिळनाडू या तीन राज्यांमध्ये विविध प्रकरणांच्या अनुषंगाने एकूण ११ ठिकाणी छाप
ईडी लोगो संग्रहित फोटो


सहकारी संस्थेच्या निधीच्या अपहाराचे आरोप‘आप’ आमदाराच्या निवासस्थानीही झाडाझडती

नवी दिल्ली, 04 नोव्हेंबर (हिं.स.) : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी केरळ, पंजाब आणि तामिळनाडू या तीन राज्यांमध्ये विविध प्रकरणांच्या अनुषंगाने एकूण ११ ठिकाणी छापेमारी केली. ‘भारत लझना मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी’चे संस्थापक सदस्य तथा व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) आर. प्रेमकुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहार व मनी लाँडरिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने बुधवारी पहाटेपासूनच या छापेमारीला सुरुवात झाली. केरळसह तामिळनाडूतील चेन्नई येथे संशयितांशी संबंधित विविध ठिकाणी तपासणी सुरू होती. केंद्रीय तपास यंत्रणेच्या अनेक पथकांनी स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई केली.दरम्यान, ईडीने बुधवारी पंजाबमधील मोगा येथे आम आदमी पक्षाच्या (आप) आमदार अमनदीप कौर अरोरा यांच्या फ्लॅटवरही छापेमारी केली. ही तपासणी सुमारे दोन तास सुरू होती.

तपास यंत्रणेने झडती घेतलेल्या ठिकाणांमध्ये आर. प्रेमकुमार यांचे कार्यालय आणि निवासस्थान यांचाही समावेश आहे. प्रेमकुमार यांनी आपल्या पदाचा आणि प्रभावाचा गैरवापर करून सोसायटीकडे सर्वसामान्य ठेवीदारांकडून जमा झालेला कोट्यवधी रुपयांचा निधी पत्नी व नातेवाइकांच्या बँक खात्यांमध्ये वळविल्याचा आरोप आहे. तसेच या पैशांचा वैयक्तिक कामांसाठी वापर केल्याचा संशय तपास यंत्रणेने व्यक्त केला आहे.

याशिवाय, प्रेमकुमार यांनी सोसायटीच्या मालकीचे ‘रागम थिएटर’ हे ‘ब्रिओस फिनवेस्ट’ या संस्थेकडे तारण ठेवल्याचा आरोप आहे. मात्र, या व्यवहारातून मिळालेली रक्कम सोसायटीच्या खात्यात जमा झाली नसल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे.ईडीच्या आरोपानुसार, प्रेमकुमार यांनी तामिळनाडूतील कांचीपुरम येथे पत्नीच्या नावावर सुमारे ५०० एकर जमीन खरेदी केली आहे. या कथित आर्थिक अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर तपास यंत्रणेकडून आर्थिक व्यवहारांची साखळी शोधणे आणि संबंधित पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.

ईडीच्या कारवायांना वेग

दरम्यान, अंमलबजावणी संचालनालयाकडून देशभरात मनी लाँडरिंग आणि आर्थिक गैरव्यवहारांच्या प्रकरणांत कारवाई सुरू आहे. २ नोव्हेंबर रोजी तपास यंत्रणेने पंजाबमधील होशियारपूर येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पंजाबचे माजी कॅबिनेट मंत्री सुंदर शाम अरोरा यांच्या निवासस्थानी झडती घेतली होती.त्यानंतर मंगळवारी श्रीनगरमध्ये दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक मदत पुरविल्याच्या कथित प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केली. उमर आदिल डार आणि त्याच्या सहकाऱ्यांशी संबंधित तपासाच्या अनुषंगाने चार ठिकाणी छापेमारी करण्यात आली.याचबरोबर अनिल अंबानी समूहाशी संबंधित बँक फसवणूक प्रकरणात ईडीने ५१० कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत.एकूणच, विविध आर्थिक गैरव्यवहारांच्या प्रकरणांमध्ये ईडीने कारवाईचा वेग वाढवला असून, संबंधित प्रकरणांचा तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande