श्रीनगरच्या बेमिना भागात अग्नितांडव, दोन जणांचा होरपळून मृत्यू; ८० झोपड्या भस्मसात
श्रीनगर, ४ नोव्हेंबर (हिं.स.) श्रीनगरमधील बेमिना भागातील दरबल परिसरात मंगळवार आणि बुधवारच्या मध्यरात्री लागलेल्या आगीत सुमारे ८० तात्पुरती घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली, ज्यात दिल्लीचे रहिवासी असलेल्या दोघांचा मृत्यू झाला. एका अधिकाऱ्याने सांगितल
श्रीनगरच्या बेमिना भागात अग्नितांडव


श्रीनगर, ४ नोव्हेंबर (हिं.स.) श्रीनगरमधील बेमिना भागातील दरबल परिसरात मंगळवार आणि बुधवारच्या मध्यरात्री लागलेल्या आगीत सुमारे ८० तात्पुरती घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली, ज्यात दिल्लीचे रहिवासी असलेल्या दोघांचा मृत्यू झाला.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, मध्यरात्री १२:२३ च्या सुमारास आग लागली आणि ताडपत्री व लाकडापासून बनवलेल्या तात्पुरत्या घरांमध्ये ती वेगाने पसरली. त्यांनी पुढे सांगितले की, या आगीत एक रिकामे पोल्ट्री फार्म आणि एक टिपर ट्रक यांचेही नुकसान झाले.अधिकाऱ्याने सांगितले की, आग विझवण्यासाठी जेबीसी आणि रावळपोरा अग्निशमन केंद्रांमधून अग्निशमन दलाच्या गाड्या, तसेच बटामालू येथील अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा मुख्यालयातून अतिरिक्त कुमक पाठवण्यात आली.

अधिकाऱ्याने सांगितले की, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवेला माहिती मिळेपर्यंत संपूर्ण परिसर आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. त्यांनी सांगितले की, आग नियंत्रणात आणल्यानंतर ढिगाऱ्याखालून दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतांची ओळख पटली असून, ते दिल्लीचे रहिवासी आणि सध्या दुरबल येथे राहणारे अब्दुल वहाब यांचे पुत्र मोहम्मद नूर आलम (२७) आणि दिल्लीचे रहिवासी व सध्या कुपवाडा येथे राहणारे मोहम्मद रफी यांचे पुत्र अल अमीन (१६) आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ते त्या भागातील भंगार गोळा करणारे होते. न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेने (फॉरेन्सिक सायन्स लॅब) प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. अधिकाऱ्याने सांगितले की, आगीचे कारण अद्याप कळलेले नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande