
नागपुरात भाजपची ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ महारॅली
काँग्रेसवर संविधान आणि लोकशाही संस्थांना बदनाम केल्याचा आरोप
नागपूर, 05 नोव्हेंबर (हिं.स.) । राहुल गांधी आणि काँग्रेसला लक्ष्य करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातून आक्रमक राजकीय इशारा दिला. “संविधानाशी खेळ कराल तर तुमचेही हात पोळतील. रस्त्यावरच्या लढाईची भाषा कराल, तर आम्हीही त्यासाठी सज्ज आहोत,” अशा शब्दांत फडणवीस यांनी राहुल गांधींना आव्हान दिले. भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ अभियानांतर्गत नागपुरात आयोजित महारॅलीपूर्वी यशवंत स्टेडियमवर झालेल्या सभेत ते बोलत होते.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशात लोकशाही व्यवस्था आणि संविधानाला लक्ष्य करण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा गंभीर आरोप फडणवीस यांनी केला. केवळ सत्तापरिवर्तन नव्हे, तर देशाची लोकशाही व्यवस्था आणि संविधान बदलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा करत त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. देशात अतिडावी विचारसरणीची व्यवस्था निर्माण करण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मतदार यादीतील नावांवरून काँग्रेसला लक्ष्य
मतदार यादीतील बांगलादेशी नागरिकांच्या नावांचा मुद्दा उपस्थित करत फडणवीस यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. चार कोटी बांगलादेशींची नावे मतदार यादीत होती, ती वगळल्यामुळे काँग्रेस अस्वस्थ झाली आहे, असा दावा त्यांनी केला. जिवंत मतदारांच्या पाठिंब्यावर विश्वास नसल्याने मृत व्यक्तींची नावे पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करण्याची मागणी केली जात असल्याची टीकाही त्यांनी केली. मतदार यादीतील कथित अनियमिततेचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी काँग्रेसवर जनमताच्या चोरीचा आरोप केला.
आणीबाणीचा दाखला देत काँग्रेसवर प्रहार
काँग्रेसच्या संविधानविरोधी भूमिकेचा इतिहास सांगताना फडणवीस यांनी १९७५ मधील आणीबाणीचा संदर्भ दिला. अलाहाबाद उच्च न्यायालयाने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची निवडणूक रद्द ठरवल्यानंतर काँग्रेसने बहुमताच्या जोरावर घटनादुरुस्ती करून पंतप्रधानांना न्यायालयीन नियंत्रणापासून संरक्षण देण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांनी केला. त्यानंतर मोरारजी देसाई यांच्या सरकारने हा बदल दुरुस्त करून पंतप्रधानही न्यायालयाच्या अधीन राहतील, अशी तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले.
‘लाल संविधान’च्या मुद्द्यावरून राहुल गांधींना सवाल
राहुल गांधी यांच्या हातातील लाल रंगाच्या संविधानाच्या प्रतीवरूनही फडणवीस यांनी टीका केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान निळ्या रंगाशी जोडलेले असताना राहुल गांधी लाल संविधान कुठून आणतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांना बदनाम करून त्यांच्यावरील जनतेचा विश्वास कमी करण्याचे काम सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील राजकीय परिस्थितीचा दाखला देत भारतातही तशाच प्रकारची अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा फडणवीस यांनी केला. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय स्तरावर कट रचला जात असल्याचा आरोप करत देशातील लोकशाही व्यवस्था टिकवण्यासाठी भाजप आणि रालोआचे सर्व घटक पक्ष मैदानात उतरल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शक्तिप्रदर्शनातून विरोधकांना संदेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमांग जोशी यांच्या नेतृत्वात ही महारॅली काढण्यात आली. यशवंत स्टेडियम येथून सुरू झालेली पदयात्रा पंचशील चौक, राणी झाशी चौक आणि व्हेरायटी चौक मार्गे संविधान चौकापर्यंत पोहोचली. भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत शक्तिप्रदर्शन केले.सभेतील भाषणातून फडणवीस यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसविरोधातील संघर्ष अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले.
---------------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी