दिवाळीत मुलांच्या डोळ्यांच्या सुरक्षेसाठी एएसजी आय हॉस्पिटलचा पुढाकार; १५ वर्षांपर्यंतच्या मुलांना मोफत उपचार
‘सुरक्षित डोळे, सुरक्षित दिवाळी’ अभियानाला सुरुवात देशव्यापी टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक जारी नोएडा, ५ नोव्हेंबर (हिं.स.) : दिवाळीच्या सणादरम्यान फटाक्यांमुळे डोळ्यांना होणाऱ्या गंभीर दुखापती टाळण्यासाठी आणि आपत्कालीन उपचार उपलब्ध करून देण्यासाठ
‘सुरक्षित डोळे, सुरक्षित दिवाळी’ हे विशेष अभियान सुरू करताना  एएसजी आय हॉस्पिटलची चमू


‘सुरक्षित डोळे, सुरक्षित दिवाळी’ अभियानाला सुरुवात

देशव्यापी टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक जारी

नोएडा, ५ नोव्हेंबर (हिं.स.) : दिवाळीच्या सणादरम्यान फटाक्यांमुळे डोळ्यांना होणाऱ्या गंभीर दुखापती टाळण्यासाठी आणि आपत्कालीन उपचार उपलब्ध करून देण्यासाठी एएसजी आय हॉस्पिटलने ‘सुरक्षित डोळे, सुरक्षित दिवाळी’ हे विशेष अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत फटाक्यांमुळे डोळ्यांना दुखापत झालेल्या १५ वर्षांपर्यंतच्या मुलांना प्राथमिक उपचार, वैद्यकीय सल्ला तसेच आवश्यकतेनुसार शस्त्रक्रियाही पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी रुग्णालयाने देशव्यापी टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक १८००१२००१११ जारी केला आहे.

नोएडाच्या सेक्टर १८ येथील रुग्णालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत नेत्रतज्ज्ञांनी पालकांना मुलांच्या सुरक्षेबाबत विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले. दिवाळीत मुले फटाके फोडण्यासाठी अधिक उत्सुक असतात. मात्र, याच काळात अपघातांचा धोकाही वाढतो, असे वरिष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. ईशा अग्रवाल यांनी सांगितले. मुलांना कधीही एकट्याने फटाके फोडू देऊ नयेत. फटाके नेहमी मोठ्यांच्या देखरेखीखाली आणि सुरक्षित अंतर राखूनच फोडावेत. तसेच मेणबत्ती किंवा अगरबत्तीचा वापर करतानाही योग्य ती खबरदारी घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.एखादा फटाका पेटला नाही, तर त्याला पुन्हा हात लावू नये किंवा जवळ जाऊन पाहण्याचा प्रयत्न करू नये. अचानक स्फोट झाल्यास डोळ्यांना गंभीर इजा होऊ शकते. डोळ्यात धूळ किंवा अन्य कण गेल्यास डोळे चोळू नयेत. तसेच तूप, तेल किंवा इतर घरगुती उपायांचा वापर टाळावा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही आय ड्रॉप्स वापरू नयेत. दुखापत झाल्यास डोळ्यावर हलकेच पेपर कप किंवा योग्य संरक्षणात्मक आवरण ठेवून तातडीने नेत्रतज्ज्ञांकडे जावे, असे डॉ. अग्रवाल यांनी सांगितले. सामान्य चष्म्याऐवजी पॉलीकार्बोनेटपासून तयार केलेले सुरक्षा चष्मे वापरण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

नेत्रतज्ज्ञ डॉ. अंकुर भटनागर यांनी सांगितले की, फटाक्यांमुळे डोळ्यांच्या कॉर्नियाला गंभीर इजा होऊ शकते. कॉर्निया हा डोळ्याचा पारदर्शक आणि अत्यंत नाजूक भाग आहे. त्यावर जखम किंवा व्रण निर्माण झाल्यास दृष्टी कायमस्वरूपी कमकुवत होण्याची शक्यता असते. त्यामुळे डोळ्यांतील किरकोळ खाज, जळजळ, लालसरपणा किंवा ओरखड्याकडेही दुर्लक्ष करू नये.डॉ. मुहतशम तौहीद यांनी प्राथमिक उपचारांबाबत माहिती देताना सांगितले की, डोळ्याच्या आतील भागाला गंभीर दुखापत झाल्याची शक्यता असल्यास डोळा धुवू नये किंवा त्यावर दबाव आणू नये. मात्र, केवळ धूळ किंवा बारुदाचे कण डोळ्यात गेल्यास स्वच्छ वाहत्या पाण्याने १० ते १५ मिनिटे हलक्या हाताने डोळा धुता येतो. दुखापतीचे स्वरूप लक्षात घेऊन तातडीने वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे.एएसजी आय हॉस्पिटल समूहाची देशभरातील ९० हून अधिक शहरांमध्ये २०० पेक्षा जास्त केंद्रे आहेत. या सर्व केंद्रांवर दिवाळीच्या दिवशीही २४ तास आपत्कालीन सेवा उपलब्ध राहणार असल्याची माहिती डॉ. भटनागर यांनी दिली. १५ वर्षांपर्यंतच्या मुलांना फटाक्यांमुळे डोळ्यांना दुखापत झाल्यास शस्त्रक्रियेसह आवश्यक आपत्कालीन उपचार मोफत दिले जाणार आहेत.

नेत्रतज्ज्ञ डॉ. अक्षय कुमार यांनी फटाक्यांच्या धुरामुळे डोळ्यांना होणाऱ्या त्रासाबाबत सावध केले. धूर आणि बारुदामुळे डोळ्यांत अॅलर्जी, कोरडेपणा आणि जळजळ होऊ शकते. त्यामुळे गरज असेल तेव्हाच बाहेर पडावे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच लुब्रिकंट आय ड्रॉप्स वापरावेत. प्रदूषण कमी करण्यासाठी हरित फटाके आणि पारंपरिक दिव्यांचा वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले.तज्ज्ञ डॉ. चेतन यांनी मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे डोळ्यांसह कानांनाही गंभीर इजा होऊ शकते, असे सांगितले. विशेषतः नवजात बालके आणि लहान मुलांना फटाक्यांच्या आवाजापासून व धुरापासून दूर ठेवावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande