

तनयची अष्टपैलू कामगिरी, तर सत्यजितची १३ बळींची विक्रमी भेदक गोलंदाजी
महाराष्ट्र आणि सिक्कीमला दणदणीत विजय
नाशिक, ०५ नोव्हेंबर (हिं.स.)। रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत नाशिकच्या दोन क्रिकेटपटूंनी आपल्या दमदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. महाराष्ट्र संघाकडून खेळणाऱ्या तनय संघवीने अष्टपैलू कामगिरी करत बंगालविरुद्धच्या विजयात मोलाचे योगदान दिले, तर सिक्कीम संघाकडून खेळणाऱ्या सत्यजित बच्छावने आपल्या भेदक डावखुऱ्या फिरकी गोलंदाजीच्या जोरावर मणिपूरविरुद्ध तब्बल १३ बळी मिळवले. या दोघांनाही आपापल्या सामन्यांत सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर झालेल्या सामन्यात तनय संघवीने आपल्या तिसऱ्याच रणजी सामन्यात प्रभावी कामगिरी केली. त्याने फलंदाजीत नाबाद ६० धावा झळकावण्यासह गोलंदाजीत पाच बळी मिळवत महाराष्ट्राच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.
पहिल्या डावात आठव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या तनयने नाबाद ६० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याने प्रदीप दाढे याच्यासोबत शेवटच्या गड्यासाठी ६० धावांची मोलाची भागीदारी केली. त्यामुळे महाराष्ट्राला २१८ धावांपर्यंत मजल मारता आली आणि बंगालवर ७५ धावांची आघाडी मिळवता आली.
याआधी आपल्या वेगवान गोलंदाजीने तनयने बंगालच्या पहिल्या डावात तीन महत्त्वपूर्ण बळी मिळवत प्रतिस्पर्धी संघाला १४३ धावांत रोखण्यात मोठी भूमिका बजावली. त्याची गोलंदाजी ९ षटके, २ निर्धाव, ३० धावा आणि ३ बळी अशी राहिली.
बंगालच्या दुसऱ्या डावातही तनयने वरच्या फळीतील दोन फलंदाजांना बाद केले. त्यामुळे बंगालचा दुसरा डाव १८६ धावांवर आटोपला. महाराष्ट्रासमोर विजयासाठी ११२ धावांचे लक्ष्य होते. सलामीवीर पृथ्वी शॉ आणि सचिन धस यांनी नाबाद अर्धशतके झळकावत हे लक्ष्य कोणताही गडी न गमावता सहज पूर्ण केले. महाराष्ट्राने १० गडी राखून दणदणीत विजय मिळवला. तनयच्या अष्टपैलू योगदानामुळे त्याला सामनावीराचा मान मिळाला.
सत्यजित बच्छावची फिरकीची जादू; मणिपूरविरुद्ध १३ बळी
दुसरीकडे, अहमदाबाद येथे सिक्कीम संघाकडून खेळताना सत्यजित बच्छावने मणिपूरविरुद्ध अफलातून गोलंदाजीचे प्रदर्शन केले. आपल्या डावखुऱ्या फिरकीच्या जोरावर त्याने सामन्यात तब्बल १३ फलंदाजांना बाद करत सिक्कीमच्या २०१ धावांच्या दणदणीत विजयात सिंहाचा वाटा उचलला.
सत्यजितने पहिल्या डावात ३४.२ षटकांत १९ निर्धाव षटके टाकत अवघ्या ५० धावा देऊन सहा बळी मिळवले. तर दुसऱ्या डावात २४ षटकांत १० निर्धाव षटके टाकून केवळ ३३ धावांत सात फलंदाजांना तंबूत पाठवले. अशा प्रकारे त्याने दोन्ही डावांत मिळून ८३ धावांच्या मोबदल्यात १३ बळी मिळवण्याची उल्लेखनीय कामगिरी केली.
विशेष म्हणजे, सत्यजितने फलंदाजीतही योगदान देत सिक्कीमच्या पहिल्या डावातील ४३२ धावांच्या धावसंख्येत ४१ धावांची भर घातली. त्याच्या भेदक गोलंदाजीसमोर मणिपूरचे फलंदाज टिकाव धरू शकले नाहीत आणि सिक्कीमने २०१ धावांनी दणदणीत विजय नोंदवला. या शानदार कामगिरीबद्दल सत्यजितला सामनावीर घोषित करण्यात आले.
नाशिकच्या क्रिकेटविश्वात आनंदाचे वातावरण
रणजी ट्रॉफीसारख्या प्रतिष्ठित स्पर्धेत तनय संघवी आणि सत्यजित बच्छाव यांनी केलेल्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे नाशिकच्या क्रिकेटविश्वात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दोघांनीही आपल्या कौशल्याच्या जोरावर नाशिकच्या क्रिकेटची गुणवत्ता राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित केली आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा तसेच संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तनय संघवी आणि सत्यजित बच्छाव यांचे विशेष अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील क्रिकेट कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
फलंदाजी आणि गोलंदाजीतील दमदार कामगिरीने नाशिकच्या या दोन खेळाडूंनी रणजी ट्रॉफीत आपली छाप उमटवली असून, त्यांच्या यशामुळे नाशिकच्या क्रिकेटप्रेमींचा अभिमान उंचावला आहे.---------------------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI