
नवी दिल्ली, 05 नोव्हेंबर (हिं.स.)इंडियन प्रीमियर लीग २०२७ हंगामाच्या पार्श्वभूमीवर, चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी चार क्रिकेटपटूंची अदलाबदल (ट्रेड) पूर्ण केली आहे. या करारानुसार, इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू लियाम लिव्हिंगस्टोन आणि ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज-अष्टपैलू जॅक एडवर्ड्स चेन्नईच्या संघात सामील झाले आहेत, तर डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमद आणि ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज नॅथन एलिस हैदराबादच्या संघात दाखल झाले आहेत.
लिव्हिंगस्टोनला सनरायझर्सने आयपीएल २०२६ हंगामापूर्वी १३ कोटी रुपयांना विकत घेतले होते, तो आता ६ कोटी रुपयांच्या सुधारित किमतीत चेन्नईमध्ये सामील होईल. जॅक एडवर्ड्स, ज्याला एसआरएचने ३ कोटी रुपयांत करारबद्ध केले होते, तो त्याच्या मूळ कराराच्या किमतीवरच चेन्नईच्या संघात जात आहे. बदल्यात, सनराझर्सने खलील आणि एलिस यांना त्यांच्या विद्यमान किमतींवर अनुक्रमे ४.८ कोटी आणि २ कोटी रुपयांत आपल्या संघात समाविष्ट केले आहे.
या अदलाबदलीमुळे दोन्ही संघांना आगामी हंगामासाठी आपापले संघ नव्याने घडवण्याची संधी मिळाली आहे; सीएसकेला अधिक अष्टपैलू क्रिकेटपटूंचे पर्याय मिळाले आहेत, तर एसआरएचने आपल्या वेगवान गोलंदाजीच्या फळीला अधिक बळकट केले आहे.जॅक एडवर्ड्स, ज्याला ऑस्ट्रेलियासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्यापूर्वीच एसआरएचने करारबद्ध केले होते, तो पायाच्या दुखापतीमुळे आयपीएल २०२६ चा संपूर्ण हंगाम खेळू शकला नव्हता.
दुसरीकडे, खलील अहमद पुन्हा एकदा सनरायझर्समध्ये परतला आहे. तो यापूर्वी २०१८ ते २०२१ या काळात या संघाचा भाग होता. या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने आयपीएल २०२५ मध्ये सीएसकेसाठी १४ सामन्यांत १५ बळी घेतले होते, पण २०२६ च्या हंगामात तो केवळ पाच सामने खेळू शकला. त्यानंतर उजव्या मांडीच्या स्नायूंच्या दुखापतीमुळे त्याचा त्या हंगामातील प्रवास तिथेच थांबला.नॅथन एलिस, जो आपल्या गोलंदाजीतील विविधतेसाठी आणि 'डेथ ओव्हर्स'मधील प्रभावी कामगिरीसाठी ओळखला जातो, तो SRH च्या वेगवान गोलंदाजीच्या पर्यायांमध्ये भर घालेल.
आयपीएल २०२६ मध्ये एसआरएचने लीग टप्प्यात नऊ विजय आणि पाच पराभवांसह १८ गुण मिळवून तिसरे स्थान पटकावले होते. पण त्यानंतर 'एलिमिनेटर' सामन्यात त्यांना राजस्थान रॉयल्सकडून पराभव पत्करावा लागला होता. दुसरीकडे, सीएसके साठी ही मोहीम निराशाजनक ठरली होती. १२ गुणांसह ते आठव्या क्रमांकावर राहिले आणि प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरले.
पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या या संघाने आयपीएल २०२७ च्या पार्श्वभूमीवर आपल्या कोचिंग सेटअपमध्ये मोठे बदल केले आहेत. भारताचे माजी वेगवान गोलंदाज झहीर खान यांनी दीर्घकाळ मुख्य प्रशिक्षक राहिलेल्या स्टीफन फ्लेमिंग यांच्याकडून ही जबाबदारी स्वीकारली आहे. मोहित शर्मा यांची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर अल्बी मॉर्केल, गॅरेथ बॅटी आणि श्रीधरन श्रीराम हे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम पाहतील. जेम्स फॉस्टर यांना क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून कायम ठेवण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे