
डकार (सेनेगल), 05 नोव्हेंबर (हिं.स.)१५ वर्षीय भारतीय बॅडमिंटनपटू तन्वी पात्रीने इतिहास घडवला. युथ ऑलिम्पिक गेम्सच्या महिला एकेरी प्रकारात अंतिम फेरीत धडक मारणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे. या क्रीडा प्रकारात भारतासाठी पहिले पदकही निश्चित केले आहे. या तरुण भारतीय बॅडमिंटनपटूने अत्यंत चुरशीच्या उपांत्य फेरीत जपानच्या दुसऱ्या मानांकित युझुनो वातानाबेचा २१-१४, ११-२१, २१-१९ असा पराभव केला.
५४ मिनिटे चाललेला हा सामना अत्यंत रोमांचक होता. दोन्ही बॅडमिंटनपटूंनी एकमेकींना जोरदार टक्कर दिली आणि सहज गुण मिळवण्याची संधी दिली नाही. तन्वीने दमदार सुरुवात करत पहिला गेम २१-१४ असा जिंकला. पण वातानाबेने दुसऱ्या गेममध्ये पुनरागमन करत तो २१-११ असा जिंकला आणि सामना निर्णायक तिसऱ्या गेमपर्यंत नेला.
अंतिम फेरीतील प्रवेशासाठी खेळल्या गेलेल्या तिसऱ्या गेममध्ये दोन्ही बॅडमिंटनपटूंमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. मात्र, निर्णायक क्षणी तन्वीने संयम राखला आणि जपानी प्रतिस्पर्ध्यावर २१-१९ अशी मात करत एक अविस्मरणीय विजय मिळवला. या विजयासोबतच तिने सुवर्णपदकाच्या लढतीत आपले स्थान निश्चित केले.
या कामगिरीसह, युथ ऑलिम्पिक गेम्सच्या बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरी गाठणारी तन्वी पहिली भारतीय महिला ठरली आहे. या स्पर्धेत भारतासाठी महिला एकेरी गटात पदक मिळवण्याची तिची कामगिरी ऐतिहासिक आहे.
तिचा हा प्रवास भारतीय बॅडमिंटनसाठी युथ ऑलिम्पिक गेम्समधील आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. याआधी, २०१० मध्ये सिंगापूरमध्ये झालेल्या पहिल्या युथ ऑलिम्पिकमध्ये एच. एस. प्रणॉयने रौप्यपदक जिंकले होते, तर २०१८ मध्ये ब्युनोस आयर्स येथे लक्ष्य सेन उपविजेता ठरला होता. २०१४ मध्ये आदित्य जोशीने मुलांच्या एकेरी गटात उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.
आता तन्वीचे लक्ष अंतिम सामन्यावर असणार आहे. ती आपल्या या ऐतिहासिक मोहिमेचा शेवट सुवर्णपदक जिंकून करण्याचा प्रयत्न करेल. अंतिम फेरीत या भारतीय बॅडमिंटनपटूचा सामना चीनच्या यी झिन झांगशी होणार आहे. तिने नुकतीच 'वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप'मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. यापूर्वी त्यांच्यात केवळ एकदाच, यावर्षीच्या 'आशिया ज्युनियर चॅम्पियनशिप'च्या उपांत्यपूर्व फेरीत सामना झाला होता. आणि या सामन्यात तन्वीला १८-२१, १६-२१ अशा फरकाने अटीतटीच्या लढतीत पराभव स्वीकारावा लागला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे