
लातूर, 06 नोव्हेंबर, (हिं.स.)। अहमदपूरचे सुप्रसिद्ध विद्रोही कवी राजेंद्र कांबळे यांचे सुपुत्र तथा अभिनेता नामांतर राजेंद्र कांबळे याने मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयाच्या जोरावर आणखी एक महत्त्वपूर्ण यश संपादन केले आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर नामांतर याची प्रमुख भूमिका असलेली व्यावसायिक जाहिरात प्रदर्शित झाली असून, या जाहिरातीत त्याला हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री क्रिती सेनॉन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे.
एखाद्या नामवंत अभिनेत्रीसमवेत व्यावसायिक जाहिरातीत झळकणे ही नामांतरच्या अभिनय प्रवासातील उल्लेखनीय उपलब्धी मानली जात आहे. त्याच्या या यशामुळे अहमदपूरच्या कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वडील राजेंद्र कांबळे यांनी विद्रोही कवितेच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. तर त्यांचे सुपुत्र नामांतर यांनी अभिनय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. वडिलांचा साहित्यिक वारसा आणि मुलाची कलाक्षेत्रातील भरारी अशा या पिता-पुत्रांच्या यशस्वी प्रवासाची सध्या अहमदपूरमध्ये विशेष चर्चा होत आहे.
दिवाळीच्या मंगलमय पर्वात मिळालेली ही यशाची भेट कांबळे परिवारासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब ठरली आहे. नामांतरच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, अभिनय क्षेत्रात त्याने आणखी मोठी भरारी घ्यावी, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
राजेंद्र कांबळे यांच्या साहित्यिक कर्तृत्वाला नामांतरच्या अभिनयाची जोड मिळाल्याने कांबळे पिता-पुत्रांची ही यशोगाथा अहमदपूरसाठी अभिमानास्पद ठरत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis