
मुंबई, 6 नोव्हेंबर (हिं.स.) : व्हिडिओकॉन इंडस्ट्रीजचे माजी प्रमोटर वेणुगोपाल नंदलाल धूत यांना मुंबईस्थित राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने (NCLT) दिवाळखोर घोषित केले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायाधिकरणाने महत्वपूर्ण निर्णय सुनावला.
न्यायिक सदस्य विनय गोयल आणि तांत्रिक सदस्य चरणजीत सिंग गुलाटी यांच्या खंडपीठाने ५ नोव्हेंबर रोजी इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्सी कोड (IBC) अंतर्गत हा आदेश दिला. सर्व कागदपत्रे आणि रेकॉर्ड तपासल्यानंतर, ही याचिका IBC च्या कलम १२३ मधील अटींची पूर्तता करत असल्याचे न्यायाधिकरणाने स्पष्ट केले. याचिका दाखल करून घेताना न्यायाधिकरणाने म्हटले की, ही याचिका कोडच्या कलम १२३ मधील सर्व आवश्यक अटी पूर्ण करते याची आम्हाला खात्री पटली आहे. यानंतर न्यायाधिकरणाने धूत यांना दिवाळखोर घोषित केले आणि या प्रक्रियेसाठी आशिष नारायण यांची 'बँकरप्सी ट्रस्टी' म्हणून नियुक्ती केली.
धूत यांची सर्व मालमत्ता आता तात्काळ या बँकरप्सी ट्रस्टीच्या ताब्यात जाईल आणि IBC च्या नियमांनुसार ती कर्जदात्यांमध्ये वाटली जाईल, असे निर्देश न्यायाधिकरणाने दिले आहेत. तसेच, धूत यांना सात दिवसांच्या आत त्यांच्या आर्थिक स्थितीचा अहवाल ट्रस्टीकडे जमा करण्यास सांगितले आहे. या ट्रस्टीला ९० दिवसांच्या आत कर्जदात्यांना नोटीस पाठवणे, दाव्यांसाठी सार्वजनिक नोटीस काढणे आणि NCLT व कमिटी ऑफ क्रेडिटर्सला प्राथमिक अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. जोपर्यंत इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्सी कोडच्या कलम १३८ अंतर्गत धूत यांना मुक्त केले जात नाही, तोपर्यंत हा आदेश लागू राहील, असेही न्यायाधिकरणाने स्पष्ट केले.
या याचिकेत बँकेने धूत यांच्यावर व्याज आणि दंडासह 12,668.06 कोटींची थकबाकी असल्याचा दावा केला. धूत यांनी याआधी कर्जाची परतफेड करण्यासाठी 600 कोटींची ऑफर दिलेली पण कर्जदात्यांनी मंजूर केली नाही. त्यानंतर, न्यायाधिकरणाने जुलैमध्ये त्यांचा प्रस्ताव फेटाळला. धूत यांनी सिलीगुडीमधील प्रस्तावित विकास प्रकल्पातून 36 महिन्यांत निधी उभारण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ही योजना भविष्यातील मंजुऱ्या आणि उत्पन्नावर अवलंबून होती आणि तात्काळ पैसे देण्याचा समावेश नव्हता.
1980 च्या दशकापासून 2000 दशकापर्यंत व्हिडिओकॉन समुहाचे प्रमोटर वेणुगोपाल धूत देशातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी होते. पण एकेकाळी घरोघरी आढळणारा लोकप्रिय ब्रँड आणि धूत स्वतः इतिहासजमा झाला आहे. एकेकाळी 50,000 कोटींच्या औद्योगिक साम्राज्याचे नेतृत्व करणारे आणि टेलिव्हिजन व रेफ्रिजरेटर्स देशभरातील लाखो घरांमध्ये अविभाज्य भाग बनवणाऱ्या उद्योगपतीला आता कायदेशीररित्या दिवाळखोर घोषित केले गेले आहे. 5 नोव्हेंबर 2026 रोजी मुंबईतील न्यायाधिकरणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या याचिकेवर धूत यांच्या विरोधात दिवाळखोरीचा आदेश जारी केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी