राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची कोणतीही अधिकृत चर्चा सुरू नाही - सुनील तटकरे
मुंबई, 06 नोव्हेंबर (हिं.स.) - सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची कोणतीही अधिकृत चर्चा सुरू नाही. मात्र, जर दिवंगत अजित पवार आज हयात असते, तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे केव्हाच विलीनीकरण झाले असते. अजितदादांनी स्वतः आपल्याला या व
सुनील तटकरे


मुंबई, 06 नोव्हेंबर (हिं.स.) - सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची कोणतीही अधिकृत चर्चा सुरू नाही. मात्र, जर दिवंगत अजित पवार आज हयात असते, तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे केव्हाच विलीनीकरण झाले असते. अजितदादांनी स्वतः आपल्याला या विलीनीकरणाची कल्पना दिली होती, असा दावा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला. इतकेच नव्हे तर, जर आज दादा असते, तर येत्या १२ फेब्रुवारी रोजी दोन्ही पक्ष अधिकृतपणे एकत्र आले असते आणि आज दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध दिसली असती. मात्र अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे ही संपूर्ण प्रक्रिया मागे पडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणावरून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. काल, गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर दुसऱ्याच दिवशी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विलीनीकरणाच्या चर्चेवर आपली भूमिका मांडली. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षासमोर निर्माण झालेली परिस्थिती, नेतृत्व आणि भविष्यातील राजकीय दिशा यांवरून अनेक तर्कवितर्क सुरू असताना तटकरे यांच्या विधानाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सुनील तटकरे यांनी शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीवर देखील प्रतिक्रिया दिली. शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीनंतरच पुन्हा राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत चर्चा सुरू झाली. या भेटीमध्ये काही वावगं आहे असं मला वाटत नाही. प्रफुल्ल पटेल तब्येतीची विचारपूस करायला गेले होते. त्यावेळी काही राजकीय चर्चा झाली असेल पण ती नेमकी कुठल्या संदर्भात असं काही भाग नाही. या भेटीचा कुणी राजकीय अन्वयार्थ काढू नये, असे आवाहन तटकरे यांनी केले.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले, सुनील तटकरेंनी सत्य परिस्थिती सांगितली. अजित पवार असताना विलीनीकरणाची चर्चा झाली होती. आज तटकरे म्हणत असले तरी आम्ही याबाबत यापूर्वीच आम्ही बोलत होतो, पण ती मानलं जात नव्हतं. ते तटकरे साहेब बोलल्यामुळे त्यावर शिक्कामोर्तब झालं. आज दोन्ही पक्ष एकत्र असते तर महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, महानगरपालिका वगैरेचं चित्र वेगळं दिसलं असतं. दादांनाही तेच अपेक्षित होतं. पक्ष मजबुतीने ताकदीने उभा राहण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायला हव्यात हे शरद पवार आणि अजित पवारांना अपेक्षित होतं. त्यादृष्टीनेच विलीनीकरणाची चर्चा झाली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande