
मालिकेच्या नवीन भागांचे चित्रीकरण थांबवले
मुंबई, 07 नोव्हेंबर (हिं.स.) : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त होत असतानाच लोकप्रिय टीव्ही शो ‘कौन बनेगा करोडपती’च्या (कबीसी) चित्रीकरणाला तात्पुरता ब्रेक देण्यात आला आहे. अमिताभ बच्चन यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे निर्मात्यांनी गेल्या आठवड्यापासून नवीन भागांचं शूटिंग थांबवल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतरच चित्रीकरण पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
चित्रीकरण थांबल्याने चॅनेलने दिवाळी विशेष कार्यक्रमांतर्गत यापूर्वी शूट केलेले सेलिब्रिटी स्पेशल भाग प्रसारित करण्यास सुरुवात केली आहे. ‘रामायण’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रणबीर कपूर, साई पल्लवी आणि रवी दुबे यांनी अलीकडेच या शोमध्ये हजेरी लावली होती. या विशेष भागाचं प्रसारण चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आसपास करण्याचं नियोजन होतं. मात्र, अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीमुळे प्रसारणाचं वेळापत्रक बदलण्यात आलं. दिवाळी विशेष आठवड्याची सुरुवात ‘रामायण’च्या टीमच्या भागाने करण्यात आली.अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यास पुढील आठवड्यापासून ‘केबीसी’चे शूटिंग पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांची तब्येत साथ देत असेल तरच चित्रीकरणाला सुरुवात केली जाईल, असं सूत्रांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी शनिवारी आपल्या ब्लॉगमधून कामावर आणि नियमित दिनचर्येकडे हळूहळू परतत असल्याचे संकेत दिले आहेत. ‘नियमित दिनचर्येकडे आणि कामाच्या नियंत्रित आयुष्याकडे हळूहळू परतण्याचा प्रवास सुरू आहे. रोजच्या दिनक्रमाची सवय झालेली असते; मात्र काही काळ त्यापासून दूर राहिल्यानंतर पुन्हा त्याच गोष्टी वेगळ्या वाटू लागतात,’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.तसेच चष्मा आणि मोबाईल कुठे ठेवला किंवा पुढे काय करायचं होतं, यांसारख्या छोट्या गोष्टी कधीकधी विसरायला होत असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. त्यांच्या या ब्लॉगमुळे ते पुन्हा कामाच्या विश्वात परतण्याच्या तयारीत असल्याचं दिसत असलं, तरी त्यांच्या प्रकृतीबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आणि चिंता कायम आहे.
------------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी