रत्नागिरी : खल्वायनची दिवाळी पाडवा मैफल भाग्यश्री देशपांडे यांच्या गायनाने रंगणार
रत्नागिरी, 07 नोव्हेंबर (हिं.स.) । सुप्रसिद्ध गायिका भाग्यश्री देशपांडे यांच्या गायनाने खल्वायनची दिवाळी पाडवा मैफल यंदा रंगणार आहे. भाग्यश्री देशपांडे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील अत्यंत सुरेल आणि भावपूर्ण गायनासाठी ओळखल्या जाणार्या आणि भक्तिस
भाग्यश्री देशपांडे


रत्नागिरी, 07 नोव्हेंबर (हिं.स.) । सुप्रसिद्ध गायिका भाग्यश्री देशपांडे यांच्या गायनाने खल्वायनची दिवाळी पाडवा मैफल यंदा रंगणार आहे. भाग्यश्री देशपांडे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील अत्यंत सुरेल आणि भावपूर्ण गायनासाठी ओळखल्या जाणार्या आणि भक्तिसंगीत व नाट्य संगीत तितक्याच ताकदीने गाणार्या आणि गणितबद्ध व लयीशी खेळणाऱ्या सरगम शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. मूळच्या आंबेजोगाई (बीड) येथील सांगीतिक वारसा लाभलेल्या आणि सध्या मुंबईत वास्तव्यास असलेल्या भाग्यश्री देशपांडे यांच्या गायनावर मेवाती व किराणा घराण्याचा प्रभाव आहे.

आग्रा आणि ग्वाल्हेर घराणे गायकीही त्यांनी आत्मसात केली आहे. त्यांचे शास्त्रीय संगीतातील सुरवातीचे शिक्षण त्यांच्या आई- वडिलांकडे झाले. त्यानंतर पंडित अजय पोहनकर, पंडित सुरेश वाडकर व नंतर पंडित सुहासजी व्यास यांच्याकडून त्यांना शास्त्रीय संगीताचे विशेष मार्गदर्शन मिळाले. त्यांनी ज्येष्ठ गायिका श्रीमती जयमाला शिलेदार यांच्याकडून नाट्यसंगीताचे मार्गदर्शन घेतले. शास्त्रीय संगीतासोबतच उप-शास्त्रीय, भक्तिसंगीत आणि नाट्यसंगीत या सर्वच प्रकारांवर त्यांची मजबूत पकड आहे. त्यांच्या आवाजात एक उपजत गोडवा आणि आर्तता आहे. जेव्हा त्या अभंग किंवा भजन गातात, तेव्हा त्यांच्या सादरीकरणातून श्रोत्यांना उच्च प्रतीच्या भक्तिरसाची अनुभूती मिळते.

'भावरंग' आणि 'अभंग रंग' हे त्यांचे सांगीतिक कार्यक्रम याच भावपूर्ण गायकीमुळे देश-विदेशात अत्यंत लोकप्रिय आहेत. शास्त्रीय गायनासाठी आवश्यक असणारे उत्तम श्वास नियंत्रण आणि आवाजाच्या पट्ट्यांचा अचूक वापर ही त्यांच्या गायकीची तांत्रिक वैशिष्ट्ये आहेत. गानहिरा, सूरमणी, संगीतरत्न, बालसरस्वती व वीरांगना सावित्रीबाई फुले या राष्ट्रीय पुरस्काराने त्या सन्मानित आहेत. नवी दिल्ली, सिकंदराबाद, अंबेजोगाई, गोवा, पुणे, मुंबई, कोल्हापूर, बीड, जबलपूर, नागपूर इत्यादी ठिकाणी तसेच अमेरिकेत त्यांचे गायनाचे कार्यक्रम झालेले आहेत.

त्यांच्या रत्नागिरीतील कार्यक्रमाला तबलासाथ हेरंब जोगळेकर, हार्मोनियमसाथ श्रीरंग जोगळेकर, पखवाजसाथ कैलास दामले, व्हायोलिनसाथ उदय गोखले, तालवाद्यसाथ वर्धन ओळकर हे रत्नागिरीचे कसलेले कलावंत करणार आहेत. फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे प्रायोजकत्व लाभलेली ही मैफल मंगळवार, दि. १० नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत गुरुकृपा मंगल कार्यालयात होणार आहे. मैफल सर्व संगीत रसिकांना विनाशुल्क असून, त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन खल्वायन संस्थेने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande