
नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी (हिं.स.)। देशांतर्गत शेअर बाजारात आज दिवसभर मर्यादित चौकटीत चढ-उतार होत राहिले आणि अखेरीस बाजार जवळपास सपाट पातळीवर बंद झाला. व्यवहाराची सुरुवात किंचित तेजीने झाली होती; मात्र तेजड्या आणि मंदड्या यांच्यातील सततच्या संघर्षामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांत दिवसाभरात चढ-उतार पाहायला मिळाले. सेन्सेक्स ०.०५ टक्क्यांच्या घसरणीसह तर निफ्टी ०.०७ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.
दिवसभराच्या व्यवहारात ऑटोमोबाईल, पीएसयू बँक आणि कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदीचा जोर कायम राहिला. कॅपिटल गुड्स, हेल्थकेअर, मेटल तसेच ऑइल अँड गॅस क्षेत्रातील शेअर्समध्येही सकारात्मक वातावरण दिसून आले. मात्र सार्वजनिक उपक्रम, टेक, एफएमसीजी आणि आयटी क्षेत्रातील शेअर्सवर विक्रीचा दबाव राहिला. सततच्या चढ-उतारामुळे मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही जवळपास सपाट बंद झाले.
बाजारात सपाट स्थिती असतानाही गुंतवणूकदारांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झाली. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ४७४.८९ लाख कोटी रुपयांवर पोहोचले, जे मागील सत्राच्या तुलनेत सुमारे ४१ हजार कोटी रुपयांनी अधिक आहे. यामुळे गुंतवणूकदारांना आजच्या व्यवहारातून मोठा फायदा झाला.
सेन्सेक्सने ८४,३३९ अंकांवर सुरुवात करून सुरुवातीला तेजी दर्शवली, मात्र नंतर विक्रीच्या दबावामुळे तो खालच्या स्तरांवर घसरला आणि अखेरीस ८४,२३३ अंकांवर बंद झाला. निफ्टीनेही २५,९९७ अंकांवर सुरुवात केली होती, घसरणीनंतर त्याने सुधारणा करत २५,९५३ अंकांवर दिवसाचा शेवट केला.
आजच्या व्यवहारात आयशर मोटर्स, अपोलो हॉस्पिटल, एसबीआय, मॅक्स हेल्थकेअर आणि मारुती सुझुकी हे टॉप गेनर्स ठरले, तर टीसीएस, कोल इंडिया, इन्फोसिस, एचसीएल टेक्नॉलॉजी आणि एटरनल हे टॉप लूजर्स ठरले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule