भारत-फ्रान्स शिखर परिषदेत 20 हून अधिक करारावर स्वाक्षरी
दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारीला नवी गती मुंबई, 17 फेब्रुवारी (हिं.स.) : पंतप्रधान नरेन्द्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या उपस्थितीत मुंबईत आयोजित भारत-फ्रान्स शिखर परिषदेत दोन्ही देशांनी विविध क्षेत्रांत २०हून अ
पंतप्रधान नरेन्द्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन


दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारीला नवी गती

मुंबई, 17 फेब्रुवारी (हिं.स.) : पंतप्रधान नरेन्द्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या उपस्थितीत मुंबईत आयोजित भारत-फ्रान्स शिखर परिषदेत दोन्ही देशांनी विविध क्षेत्रांत २०हून अधिक करारांची घोषणा केली. या करारांमध्ये संरक्षण, कौशल्य विकास, तंत्रज्ञान आणि आरोग्य यांसारखे महत्त्वाचे क्षेत्र समाविष्ट आहेत, जे दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करतील.

परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी कर्नाटकमध्ये H125 हेलिकॉप्टरच्या अंतिम असेंब्ली लाईनचे आभासी उद्घाटन केले. एयरबस आणि टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टिम्सच्या संयुक्त प्रयत्नातून स्थापन झालेली ही असेंब्ली लाईन ‘मेक इन इंडिया’ मोहिमेत भारतातील संरक्षण आणि एरोस्पेस उत्पादनाला चालना देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

पंतप्रधान मोदींनी संयुक्त प्रेस परिषदेत सांगितले की भारत आणि फ्रान्समधील भागीदारी कोणत्याही सीमितीमध्ये अडकलेली नाही आणि ती सागरी खोऱ्यापासून ते सर्वोच्च पर्वतांपर्यंत पोहोचते. त्यांनी H125 हेलिकॉप्टराचे उदाहरण देत म्हटले, आम्हाला अभिमान आहे की भारत आणि फ्रान्स मिळून, माउंट एव्हरेस्टच्या उंचीवर उडणारे जगातील एकमेव हेलिकॉप्टर भारतात तयार करतील आणि संपूर्ण जगात निर्यात करतील असे मोदी म्हणाले. तसेच भारत आणि युरोपच्या संबंधांत 2026 हे वर्ष महत्त्वपूर्ण वळण देणारे ठरेल. या वर्षी इंडो-फ्रेंच सेंटर फॉर आर्टिफिशियल इंटेलिजेंस इन हेल्थ, इंडो-फ्रेंच सेंटर फॉर डिजिटल सायन्स अँड टेक्नॉलॉजी, आणि नेशनल सेंटर ऑफ एक्सीलन्स फॉर स्किलिंग इन एरोनॉटिक्स सुरू होणार आहेत.पंतप्रधान मोदी म्हणाले की भारत आणि फ्रान्सचे संबंध खरोखर अद्वितीय आहेत आणि फ्रान्स हा भारताचा सर्वात जुना धोरणात्मक भागीदार आहे. परस्पर विश्वास आणि सामायिक दृष्टीकोनावर आधारित हे संबंध आता विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेले जात असल्याचे मोदींनी सांगितले.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी सांगितले की, भारत आणि फ्रान्समधील द्विपक्षीय संबंध खरोखर अपवादात्मक आणि विशिष्ट आहेत. आज आम्ही हे संबंध विशेष धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या आठ वर्षांत आम्ही इंडो-पॅसिफिक क्षेत्र, तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि आंतरराष्ट्रीय सोलर अलायन्ससारख्या अनेक महत्त्वाच्या उपक्रमांना सामायिकरीत्या पुढे नेले आहे.

या शिखर परिषदेच्या निकालांमुळे भारत आणि फ्रान्सच्या धोरणात्मक, तांत्रिक आणि आर्थिक भागीदारीला नवी दिशा आणि गती मिळाली आहे, जी जागतिक स्थिरता आणि प्रगतीसाठी देखील महत्त्वपूर्ण ठरेल.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande