
- इंडिया एआय इम्पॅक्ट समिटचे यजमानपद भारतासोबतच ग्लोबल साऊथसाठी अभिमानाची बाब
नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी (हिं.स.) - एआय अधिकाधिक लोकांसाठी उच्च-मूल्याच्या, सर्जनशील आणि अर्थपूर्ण संधी उपलब्ध करेल. ज्यामुळे नवोन्मेष, उद्योजकता आणि उद्योगांसाठी नवीन संधी निर्माण होतील. कौशल्य विकास, कौशल्य पुनर्विकास आणि आजीवन शिक्षण ही एक जनचळवळ बनवावी. जर मानवतेतील एकवाक्यता पुढे गेली तर कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी क्षमतांना नवीन उंचीवर नेईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026’ च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमात फ्रान्स प्रजासत्ताकाचे अध्यक्ष, महामहिम इमॅन्युएल मॅक्रॉन, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस, राष्ट्रप्रमुख, मंत्री, बहुपक्षीय संस्थांचे वरिष्ठ प्रतिनिधी आणि तंत्रज्ञान आणि एआय उद्योगातील नेते असे मान्यवर उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, जगभरातील एक षष्ठांश मानवजातीचे प्रतिनिधित्व करत असलेल्या भारतात, जगातील ही सर्वात मोठी आणि ऐतिहासिक एआय इम्पॅक्ट समिट परिषद होत आहे. भारतामध्ये जगातील सर्वात मोठी युवा लोकसंख्या आहे, तंत्रज्ञान विषयक कौशल्यांच्या बाबतीत सर्वात मोठे मनुष्यबळ भारतात आहे, यासोबतच भरभराटीला आलेली तंत्रज्ञानाधारीत परिसंस्थाही भारतात आहे. भारत केवळ नवीन तंत्रज्ञानाची निर्मिती करत नाही, तर अभूतपूर्व वेगाने तंत्रज्ञानाचा अवलंबही करत आहे. 140 कोटी भारतीय नव्या तंत्रज्ञानांचा अंगिकार करण्यासाठी उत्सुक आहे. या सगळ्यांच्या वतीने त्यांनी, या परिषदेसाठी आलेल्या विविध देशांचे प्रमुख, जागतिक एआय विषयक परिसंस्थेतील आघाडीची व्यक्तिमत्वे आणि या परिषदेत सहभागी झालेल्या संशोधकांचे स्वागतही केले. या सगळ्यांनी नोंदवलेल्या सहभागाबद्दल त्यांनी कृतज्ञताही व्यक्त केली. या परिषदेचे यजमानपद भूषवणे ही केवळ भारतासाठीच नव्हे, तर ग्लोबल साऊथ अंतर्गत असलेल्या प्रत्येक देशासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
या परिषदेमुळे कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील जगातील सर्व दिग्गज एका ठिकाणी आले आहेत, या परिषदेतील 100 पेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधी आणि जगभरातील प्रतिष्ठित सहभागींच्या सहभागामुळे या परिषदेच्या यशाने नवी उंची गाठली आहे असे त्यांनी सांगितले. या परिषदेत युवा पिढीतील प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत, यामुळे एक नवा आत्मविश्वास निर्माण होऊ लागला असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले. सहसा नवीन तंत्रज्ञानाकडे सुरुवातीच्या काळात संशयाने पाहिले जाते, मात्र जगभरातील युवा वर्गाने ज्या वेगाने कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे, या तंत्रज्ञानावर स्वतःची छाप सोडत ज्या पद्धतीने त्याचा वापर करण्याची वृ्त्ती दाखवली आहे ती अभूतपूर्व असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या शिखर परिषदेतील प्रदर्शन हे युवा प्रतिभेच्या उत्साहाने भारलेले असल्याचे त्यांनी सांगितले. कृषी, संरक्षण, दिव्यांगांसाठीची सहाय्यक साधने आणि बहुभाषिक लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासंबंधित विविध क्षेत्रांअंतर्गत मांडलेल्या उपाययोजनांमधून मेड इन इंडियाची ताकद दिसून येते, त्यासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील भारताच्या नवोन्मेषाचेही दर्शन होते ही बाब त्यांनी अधोरेखित केली.
मानवी इतिहासामध्ये दर काही शतकांनी मानवी संस्कृतीची दिशाच पूर्णपणे बदलून टाकणारे वळण येत असते असे ते म्हणाले. अशाच महत्त्वाच्या असलेल्या क्षणांमुळे विकासाचा वेग बदलतो, त्यासोबतच आपल्या विचार करण्याची, समजून घेण्याची तसेच काम करण्याची पद्धतही पूर्णपणे बदलून जात असते असे त्यांनी सांगितले. अशाप्रकारच्या परिवर्तनाच्या मोठ्या काळात, याचा प्रभाव नेमका किती आहे, हे अनेकदा त्यावेळी लक्षात येत नाही असे ते म्हणाले. जेव्हा दगडांच्या घर्षणातून पहिल्यांदा ठिणग्या निर्माण झाल्या होत्या, तेव्हा तीच ठिणगी पुढे मानवी संस्कृतीचा आधारभूत पाया बनणार असल्याची कल्पना त्यावेळी कोणीही केली नव्हती असेही त्यांनी सांगितले. केवळ मुखाने बोलल्या जाणाऱ्या भाषेचे ज्यावेळी पहिल्यांदा लिप्यांमध्ये रूपांतर झाले, तेव्हा हे लिखित ज्ञानच भविष्यातील सर्व व्यवस्थांचा कणा ठरणार असल्याची जाणीवही त्याकाळी कोणाला झाली नव्हती ही बाबही त्यांनी नमूद केली. इतकेच नाही तर जेव्हा पहिल्यांदा बिनतारी पद्धतीने संकेतांच्या स्वरुपात संदेश पाठवले गेले होते, तेव्हा एक दिवस संपूर्ण जग वास्तव काळात परस्परांच्या संपर्कात येईल अशी कल्पनाही त्यावेळी कोणी करू शकले नसेल असे ते म्हणाले.
पार्श्वभूमी
सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय म्हणजेच सर्वांचे कल्याण, सर्वांचे हित अशी इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 याची संकल्पना आहे. भारताला एआय क्षेत्रात एक अग्रणी म्हणून स्थान मिळवून देणे आणि अशा भविष्याची कल्पना करणे जिथे एआय मानवतेची प्रगती साधेल, समावेशक विकासाला चालना देईल आणि आपल्या सर्वांच्या पृथ्वीग्रहाचे रक्षण करेल.
जन, पृथ्वी आणि प्रगती,या तीन स्तंभांवर आधारित सात कार्यगट या शिखर परिषदेचे नेतृत्व करत आहेत: विविध क्षेत्रांमध्ये एआयचा प्रभाव दर्शवित ठोस परिणाम देण्यावर हे गट काम करतील. आर्थिक विकास आणि सामाजिक कल्याणासाठी एआय; संसाधनांच्या लोकशाहीकरणासाठी एआय; सामाजिक सक्षमीकरणातील समावेश; सुरक्षित आणि विश्वासार्ह एआय; मानवी भांडवल; विज्ञान; लवचिकता, नवोन्मेष आणि कार्यक्षमता,अशा सात संकल्पना याअंतर्गत आहेत:
या शिखर परिषदेत 500 हून अधिक जागतिक एआय धुरीण एकत्र येतील, ज्यात सुमारे 100 प्रमुख कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक (सीईओ/सीएक्सओ),150 शिक्षणतज्ज्ञ आणि संशोधक आणि 400 सीटीओ, उपाध्यक्ष आणि जनहितैषी व्यक्तींचा समावेश असेल. तसेच यामध्ये 100 हून अधिक सरकारी प्रतिनिधी देखील सहभागी होतील, ज्यात 20 हून अधिक राज्यांचे आणि प्रमुख प्रशासकीय अधिकारी आणि सुमारे 60 मंत्री आणि उपमंत्री यांचा समावेश असेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी