
त्नागिरी, 18 फेब्रुवारी, (हिं. स.) : येथील खल्वायन संस्थेची ३२२वी मासिक संगीत सभा मुंबईच्या गायिका सौ. शर्वरी नागवेकर-वैद्य यांच्या माधुर्ययुक्त दमदार गायनाने रंगली.
येथील सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात ही संगीत सभा नेहमीप्रमाणेच उत्साहात पार पडली. कुर्धे येथील कै. महर्षी गणेश रामचंद्र बेहेरे व कै. रामकृष्ण गणेश बेहेरेबुवा स्मृती संगीत मैफल म्हणून ही मैफल साजरी झाली. चिपळूणचे कलारसिक चंद्रकांत जोशी यांच्या हस्ते नटराज पूजन, दीपप्रज्वलन होऊन श्रीफळ वाढविले गेले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन प्रदीप तेंडुलकर यांनी केले. सन्मानपत्र, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन कलाकारांचे आभार श्रीनिवास जोशी यांनी मानले.
मैफलीची सुरवात पूराया धनाश्री रागातील विलंबित एकतालात निबद्ध 'बाली बाली जाऊ' या पारंपरिक बंदिशीने झाली. त्याला जोडून द्रुत एकतालातील बंदिश झाली. त्यानंतर दुर्गा रागातील कुमारजींची मध्य लय रूपकातील व द्रुत तीन तालातील बंदिश झाल्यावर त्यांनी कुमारजींचा धानी रागातील तान धेरेना हा तराणा सादर केला. दमदार, धारदार स्वरलगाव आणि तितक्याच तार सप्तकातील माधुर्ययुक्त आलाप, ताना यांमुळे मैफल सुरवातीपासूनच रंगतदार होत गेली. त्यानंतर शब्दावाचून कळले सारे, खरा तो प्रेमा, नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग व शेवटी कानडा राजा पंढरीचा या पदाने त्यांनी आपल्या मैफलीचा शेवट केला.
मैफलीला दमदार साथ सोहम जोशी (दापोली, तबला), अमित ओक (चिपळूण, हार्मोनियम) चाँदनी गाडी (तानपुरा) यांनी दमदार साथ केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी