
वॉशिंग्टन , 20 फेब्रुवारी (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माजी ब्रिटिश राजपुत्र प्रिन्स अँड्र्यू , ड्यूक ऑफ यॉर्क यांच्या अटकेला “लाजिरवाणी” आणि राजघराण्यासाठी अत्यंत वाईट घटना असे संबोधले आहे. ही अटक लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीन याच्याशी संबंधित प्रकरणात करण्यात आली आहे.
पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, “मला वाटते ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. हे खूप दुःखद आहे. राजघराण्यासाठी ही फार वाईट गोष्ट आहे.” अँड्र्यू यांना ‘पब्लिक ऑफिसमधील गैरवर्तन’ या संशयावरून अटक करण्यात आली असून हे प्रकरण एपस्टीनसोबतच्या त्यांच्या कथित संबंधांशी संबंधित आहे. अनेक माध्यमांच्या अहवालानुसार, चौकशीदरम्यान त्यांची सुटका करण्यात आली आहे.
थेम्स व्हॅली पोलीस यांनी बर्कशायर आणि नॉरफोक येथील ठिकाणी छापे टाकून ६० वर्षीय व्यक्तीला अटक केली. सुरुवातीला पोलिसांनी नाव जाहीर केले नव्हते; मात्र नंतर अँड्र्यू यांना पोलीस ठाण्यातून बाहेर पडताना पाहिले गेले. योगायोगाने गुरुवारी त्यांचा वाढदिवसही होता. दरम्यान, ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरा यांनी निवेदन जारी करून म्हटले की, “कायद्याने आपले काम करावे.” अधिकृत निवेदनात त्यांनी नमूद केले, “अँड्र्यू माउंटबेटन-विंडसर यांच्यावरील पब्लिक ऑफिसमधील गैरवर्तनाच्या संशयाची बातमी ऐकून मला अत्यंत चिंता वाटली आहे. याची पूर्ण, निष्पक्ष आणि योग्य चौकशी होईल. आम्ही पूर्ण आणि मनापासून सहकार्य करू.”कायदेशीर प्रक्रिया सुरू असताना अधिक भाष्य करणे उचित नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच राजघराणे सार्वजनिक कर्तव्य आणि सेवेत सातत्य ठेवेल, असेही सांगितले.
दरम्यान अँड्र्यू यांनी एपस्टीनशी संबंधित सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांनी पूर्वी म्हटले होते की, एपस्टीनच्या कोणत्याही गुन्हेगारी कृत्यांविषयी त्यांना माहिती नव्हती किंवा शंका आली नव्हती. नव्या आरोपांवर त्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.तर राजा चार्ल्स यांनी यापूर्वीच अँड्र्यू यांचा ‘प्रिन्स’ हा किताब काढून घेतला आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाकडून एपस्टीनशी संबंधित नवे दस्तऐवज जाहीर झाल्यानंतर ही चौकशी वेगाने सुरू झाली. तसेच, विंडसर येथील २००३ पासूनच्या त्यांच्या निवासस्थानातून अँड्र्यू यांना हटवण्याची प्रक्रिया देखील राजांनी सुरू केली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode