
मुंबई, 26 फेब्रुवारी (हिं.स.) - टिपू सुलतान हा राजा म्हणून कसा होता, हा वादाचा वेगळा विषय असू शकतो; परंतु त्याची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी करणे आणि त्याला महाराजांपेक्षाही थोर ठरवण्याचा प्रयत्न करणे, हे अत्यंत आक्षेपार्ह आहे. आपल्याला वर्षानुवर्षे हेच शिकवण्यात आले की टिपू सुलतान हा एक महान आणि आदर्श राजा होता. मात्र, इतिहासाची दुसरी काळी बाजू नेहमीच दडवून ठेवली गेली. टिपू सुलतानाने ७५ हजार हिंदू आणि ३३ हजार नायरांची क्रूर कत्तल केली, हे सत्य शालेय पाठ्यपुस्तकांतून किंवा अधिकृत इतिहासातून कधीच समोर येऊ दिले नाही, अशी खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत व्यक्त केली. राज्यपालांच्या अभिभाषणावरील अभिनंदनाच्या ठरावावरील चर्चेचा उत्तर देतांना फडणवीस बोलत होते.
फडणवीस पुढे म्हणाले, काँग्रेस सरकारच्या काळात एनसीईआरटीच्या पाठ्यक्रमात मोगलांचा इतिहासासाठी १७ पाने देण्यात आली; मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास केवळ एका परिच्छेदात शिकवला गेला. ७० वर्षे या देशात चुकीचा इतिहास शिकवला गेला. ‘टिपू सुलतान महान’ ही देशाच्या इतिहातील छेडछाड होय, असेही ते म्हणाले. टिपू सुलतानाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतके मोठे मानने याला आमचा आक्षेप आहे. देशात योग्य वेळी खरा इतिहास शिकवला गेला असता, तर देशातील एकाही मुसलमानाने औरंगजेबाला नायक मानले नसते; परंतु काँग्रेस सरकारच्या काळात देशात खरा इतिहास शिकवला गेला नाही. या देशात अनेक राष्ट्रभक्त मुसलमान आहेत, त्याला आमचा आक्षेप नाही. जे देशावरील आक्रमकांना नायक मानतील त्यांना आम्ही सोडणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासनाने छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठे यांच्या इतिहासासाठी ‘एनसीआरटी’ पाठ्यक्रमात २० पाने दिली आहेत.
ब्रिटीशांविरुद्धच्या लढाईबाबत बोलताना फडणवीस यांनी एक नवा दृष्टिकोन मांडला. टिपू सुलतान इंग्रजांशी लढला हे जरी सत्य असले, तरी तो लढा राष्ट्रप्रेमातून नसून केवळ स्वतःचे राज्य आणि सत्ता वाचवण्यासाठी होता, हे जनतेला कधीच सांगितले गेले नाही. केवळ ब्रिटीशांविरुद्ध लढला म्हणून त्याला ‘महान’ ठरवणे आणि त्याची तुलना रयतेचे राज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांशी करणे, हा महाराजांचा आणि त्यांच्या दैदिप्यमान इतिहासाचा अवमान असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले. इतिहासाच्या या उपेक्षेमुळेच समाजात चुकीचे आदर्श निर्माण झाले, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी