ईशान्य भारतामध्ये दक्षिण-पूर्व आशियाई व्यापार कॉरिडॉर विकसित होण्याची मोठी क्षमता : डॉ. जितेंद्र सिंह
नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी (हिं.स.) - ईशान्य भारतामध्ये दक्षिण - पूर्व आशियाई व्यापार कॉरिडॉर म्हणून विकसित होण्याची मोठी क्षमता असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. आपल्या त्रिपूरा भेटीत डॉ.जितेंद्र सिंह यांनी सिपाहीजाल
जितेंद्र सिंह


नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी (हिं.स.) - ईशान्य भारतामध्ये दक्षिण - पूर्व आशियाई व्यापार कॉरिडॉर म्हणून विकसित होण्याची मोठी क्षमता असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. आपल्या त्रिपूरा भेटीत डॉ.जितेंद्र सिंह यांनी सिपाहीजाला जिल्ह्यातील कमलासागर इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिषद सभागृहात झालेल्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे अध्यक्षपद भूषवले.

त्रिपुरात बांबु उत्पादनाशी संबंधित अफाट संधी असून, त्याची चाचपणी व्हायला हवी , अशा संधीचा व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य आणि पद्धतशीर वापर वाढवायला हवा असे आवाहन त्यांनी जिल्हा प्रशासनाला केले. त्रिपुरा ते बांगलादेश ही रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर, हा वापराच्या दृष्टीने एक सुलभ आणि किफायतशीर व्यापारी मार्ग ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

त्रिपुरामध्ये बांबूची समृद्ध वने आहेत, मात्र या साधनसंपत्तीचा पुरेसा उपयोग करून घेतला गेला नाही असे ते म्हणाले. बांबू हे एक बहुपर्यायी आणि बहुपयोगी उत्पादन आहे, बांधकाम, गृह सजावट, दागिने, हस्तकला आणि फर्निचरसाठी बांबूचा वापर केला जातो असे त्यांनी सांगितले. बांबू उत्पादनांच्या मूल्यवर्धनाचा विस्तार केला आणि बांबूच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली गेली तर त्रिपुराची व्यापारी क्षमता वाढेल आणि रोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण होऊ शकतील असे त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ.जितेंद्र सिंह यांनी प्रादेशिक दळणवळीय जोडणीचाही उल्लेख केला. आपण त्रिपुराचे राज्यपाल असताना त्रिपुराला बांगलादेशासोबत जोडणाऱ्या रेल्वे मार्गाचे काम सुरु झाले होते याचे स्मरण त्यांनी करून दिले. या प्रकल्पाला यापूर्वीच मंजूरी मिळालेली आहे, आणि या प्रकल्पावर काम सूरू आहे असे त्यांनी सांगितले. बांगलादेशातील सध्याच्या परिस्थितीमुळे सध्या या प्रकल्पाच्या कामाचा वेग काहीसा मंदावला असल्याची बाबही त्यांनी नमूद केली. मात्र ही थेट रेल्वे सेवा सुरू झाल्यावर, त्रिपुरा आणि पर्यायाने संपूर्ण ईशान्य भारताचे क्षेत्र हे व्यापार आणि व्यवसायाचे दक्षिण आशियाई कॉरिडॉर म्हणून ओळखले जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या आढावा बैठकीदरम्यान जिल्हा प्रशासनाच्या वतीने विकासाचे निर्देशक आणि प्रशासकीय उपक्रमांबाबतचे तपशीलवार सादरीकरणही करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande