
बीड, 26 फेब्रुवारी (हिं.स.)।
जिल्हाधिकारी, बीड यांनी केज तालुक्यातील विविध ठिकाणी भेट देऊन शासकीय कार्यालये, औद्योगिक आस्थापना तसेच केंद्र शासन पुरस्कृत विकास योजनांच्या अंमलबजावणीचा प्रत्यक्ष पाहणीद्वारे सखोल आढावा घेतला.
कुंबेफळ (ता. केज) येथे व्यंकटेश्वरा जीनिंग मिलला भेट देऊन कापूस प्रक्रिया, शेतकऱ्यांशी संबंधित बाबी, कामगार व्यवस्थापन तसेच उद्योगातील कार्यपद्धतीची माहिती घेतली. कृषी व औद्योगिक क्षेत्रातील परस्पर समन्वय अधिक सक्षम करण्याबाबत संबंधितांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
तहसील कार्यालय, केज येथे तहसील कार्यालयातील कर्मचारी, सर्व मंडळ अधिकारी व सर्व ग्राम महसूल अधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत महसूलविषयक प्रकरणांचा वेळेत व गुणवत्तापूर्ण निपटारा करणे, नागरिकांना सुलभ व पारदर्शक सेवा देणे, ई-ऑफीस प्रणालीचा प्रभावी वापर तसेच शासन निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियान अंतर्गत केज नगरपंचायत क्षेत्रात राबविण्यात येत असलेल्या हरित क्षेत्र विकास व तलावाचे सरोवर पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या अनुषंगाने नगरपंचायत केज येथे आढावा बैठक घेण्यात आली. प्रकल्पांची सद्यस्थिती, कामांची गुणवत्ता, निधी खर्च, तसेच निर्धारित कालमर्यादेत कामे पूर्ण करण्याबाबत संबंधित यंत्रणांना आवश्यक निर्देश देण्यात आले.
राजीव गांधी तलाव, केज येथे प्रत्यक्ष भेट देऊन हरित क्षेत्र विकास व तलावाचे सरोवर पुनरुज्जीवन प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. पर्यावरण संवर्धन, पाणी साठवण क्षमतेत वाढ, नागरिकांसाठी स्वच्छ व सुरक्षित सार्वजनिक सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने कामे नियोजनबद्ध व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis