
पुणे, 26 फेब्रुवारी, (हिं.स.) - पुण्यातील गणेशखिंड, आकाशवाणी अधिकारी-कर्मचारी वसाहत, कोंढवा, हडपसर, कात्रज, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, संतोषनगर आणि अंजीननगर यांसह पीएमसीच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सुमारे ११५ भागांत दूषित पाणीपुरवठा होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. क्षेत्रीय कार्यालयातील पाणीपुरवठा विभागात तशा नोंदीही आहेत. शिवाजीनगर, पर्वती दर्शन, सनसिटी, माणिकबाग, धनकवडी, धायरी, किरकटवाडी आणि रहाटणी, पवननगर येथील रहिवासी दूषित पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त असून दूषित पाणी प्यायल्याने ‘गुलियन बॅरी सिंड्रोम’(जीबीएस)सारख्या गंभीर आजारांचा धोका बळावत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत.
दरम्यान, जुन्या जलवाहिन्या आणि ड्रेनेज लाइनचे अंतर जवळ असल्याने सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळत आहे. यासाठी संपूर्ण शहरातील विविध भागांत तब्बल ११५ ठिकाणी नवीन जलवाहिन्या बदलण्यासाठी २० कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय, तांत्रिक मान्यता मिळाली आहे. निविदा प्रक्रियांना वेग देण्यात येणार असून, येत्या १५ दिवसांत शहरातील ११५ भागांत जलवाहिन्या बदलण्याचे काम सुरू होणार असल्याची माहिती पीएमसीचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता वीरेंद्र केळकर यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु